लाचखोरीच्या प्रकरणामुळे भ्रष्टाचार चव्हाटय़ावर

रायगड पोलीस दलातील दोन वरिष्ठ अधिकारी आणि एक कर्मचारी गेल्या चार महिन्यांत लाचखोरीच्या प्रकरणात जेरबंद झाले. तर एका पोलीस उपनिरीक्षकाला पोलीस भरतीत नोकरीचे अमिष दाखवून  ५० हजार उकाळल्या प्रकरणी निलंबित करण्यात आले. खालापूर येथे पोलीस कर्मचाऱ्यावर बलात्कार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सातत्याने समोर येणाऱ्या या घटनांमुळे पोलीस दलातील भ्रष्टाचार चव्हाटय़ावर आला आहे. आणि जनमानसातील पोलिसांच्या प्रतिमेला तडा गेला आहे.  कंपन्यांमधील भंगार विकत घेणाऱ्यांविरोधात खोपोली पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यत आरोपींवर अटकेची कारवाई होऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक राजन जगताप यांनी सहा  लाख रुपायांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर ४ लाख रुपये आणि दोन विदेशी मद्याच्या बाटल्या स्विकारण्याचे जगताप यांनी मान्य केले होते. यातील एक लाख रुपयांचा पहिला हप्ता स्विकारताना जगताप यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे पथकाने नुकतेच जेरबंद केले. दुसऱ्या एका घटनेत रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश सकपाळ आणि पोलीस शिपाई बाळकृष्ण जाधव यांच्यावर लाचखोरीच्या प्रकरणात कारवाई झाली. तक्रारदार यांचा भंगाराचा व्यवसाय होता. अनधिकृत जागेत चालणाऱ्या या व्यवसायावर कारवाई होऊ नये. यासाठी पोलिसांना दरमहा लाच दिली जात होती. ही लाचेची रक्कम वाढवून मिळावी यासाठी दोघांनी तगादा लावला होता. अखेर तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे १० जानेवारीला या प्रकरणाची तक्रार दिली. १६ जानेवारीला दोघांनाही ८ हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. तिसऱ्या प्रकरणात पोलीस भरती प्रक्रीयेत नोकरीचे अमिष दाखवून उमेदवाराकडून ५० हजार उकळणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली, हेमंत नाईक हे रायगड पोलीस दलात श्वान पथकात कार्यरत होते. पोलीस भरती दरम्यान तक्रारदार राजेंद्र पवार यांच्याकडून नोकरीचे सेंटीग लावण्याचे अमिष दाखवून ५० हजार घेतल्याची तक्रार दक्षता समितीकडे नोंदवण्यात आली. यानंतर पोलीस अधिक्षकांनी हेमंत नाईक यांची विभागीय चौकशी सुरु करून त्यांना निलंबित केले. लाचखोरीची पहिली दोन प्रकरणे भंगार व्यवसायाशी निगडीत होते, आणि दोन्ही प्रकरणात ठाण्याच्या लाचलुचपत विभाग प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. पोलीस दलात फोफावलेला भ्रष्टाचार या दोन्ही घटनांमुळे समोर आला. भंगार व्यवसाईकांकडून पोलिसांना सुरु असेलेली हप्तेखोरी या निमित्ताने समोर आली. या घटनांमुळे पोलिसांची जनमानसातील प्रतिमा मलिन झाली. त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. पोलिसांकडून अनधिकृत व्यवसायांना मदत होते आहे का? अशी चर्चा सुरु झाली. या सर्व प्रकरणांची वरिष्ठ पोलीस प्रशासनाने गांभिर्याने दखल घेणे गरजेचे आहे. अन्यथा पोलिसांच्या जनमानसातील प्रतिमेचे भंजन झाल्या शिवाय राहणार नाही.