News Flash

महाराष्ट्राच्या फुफ्फुसाला रायगड पुरवतोय ऑक्सिजन; मुंबई, पुण्यासह मराठवाड्यासाठी ठरला जीवनरक्षक

जिल्ह्यातून दररोज ६३० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा

रायगड जिल्ह्यातून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांना ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे.

-हर्षद कशाळकर

अलिबाग- करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजनआभावी अनेक ठिकाणी रुग्ण दगावल्या घटना घडल्या आहेत. घडत आहेत. राज्यातही अनेक ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता जाणवत असल्याने देशाच्या वेगवेगळ्या भागातून रेल्वे आणि जलमार्गाने ऑक्सिजन आणला जात आहे. कठीण अशा ऑक्सिजन टंचाईच्या काळात रायगड जिल्हा हा राज्यासाठी जीवरक्षकाप्रमाणे धाऊन आला आहे. जिल्ह्यातून राज्यभरात दररोज ६३० मेट्रिक टन प्राणवायूचा पुरवठा केला जात आहे.

रायगड जिल्ह्यात पेण डोलवी, तळोजा आणि माणगाव याठिकाणी ऑक्सिजनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात आहे. पेण डोलवी येथील जेएसडब्लू कंपनीत २२४  मेट्रिक टन, तळोजा येथील कंपनीतून २३२ मेट्रिक टन, तर माणगाव येथील कंपनीतून १८०  मेट्रिक टन ऑक्सिजन दररोज उत्पादित केला जात आहे. याशिवाय अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ६ मेट्रिक टन प्राणवायू प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. या सर्व प्रकल्पातून दररोज ६५० मेट्रिक टन ऑक्सिजन तयार होत आहे. जिल्ह्याला लागणारा ऑक्सिजन ठेऊन उर्वरित सर्व ऑक्सिजनचा साठा राज्यातील विविध भागात पुरवला जात आहे.

करोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज लागत आहे. त्यामुळे कृत्रिम ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा परिस्थितीत रायगड जिल्हा राज्यासाठी ऑक्सिजन मोठा पुरवठादार म्हणून समोर आला आहे. जिल्ह्यातून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी,  सिधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, नांदेड, बीड, औरंगाबाद, जालना, परभणी तसेच इतर जिल्ह्यांना आत्तापर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला आहे.

जिल्ह्यात ऑक्सिजनअभावी झाला नाही एकही मृत्यू

रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती होत असल्याने जिल्ह्यात आतापर्यंत ऑक्सिजनअभावी एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. जिल्ह्याला दररोज ३० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासते, यातील सहा मेट्रिक टन ऑक्सिजन जिल्हा रुग्णालयातील प्रकल्पातून तयार होतो. उर्वरित गरज ही औद्योगिक कंपन्याकडून तसेच ऑक्सिजन पुरवठादारांकडून भागत आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात कुठेही प्राणवायूची कमतरता जिल्ह्यात जाणवली नाही.

चार उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणार

“ऑक्सिजनच्याबाबतीत आरोग्य यंत्रणेला स्वयंपूर्ण करण्याचे प्रयत्न आम्ही सुरु केले आहेत. पहिल्या टप्प्यात अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात ६ मेट्रिक टन क्षमतेचा ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यात आता चार उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. काम सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. हे प्रकल्प सुरु झाले तर जिल्हाची आरोग्य यंत्रणा ऑक्सिजनच्याबाबतीत स्वयंपूर्ण होऊ शकेल,” अशी माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2021 4:58 pm

Web Title: raigad produce oxygen oxygen express train oxygen shortage maharashtra oxygen supply bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Cyclone Tauktae: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज; कोकण किनारपट्टीवर अलर्ट जारी
2 “कुठून हे नग मिळतात?,” जितेंद्र आव्हाड भाजपाच्या माजी मुख्यमंत्र्यांवर संतापले
3 मोदींच्या साक्षीनेच लोक शंभर रुपये लिटरने पेट्रोल भरताहेत -अजित पवार
Just Now!
X