28 February 2021

News Flash

रायगडमध्ये वर्षा सहलीचा पहिला बळी, कल्याणमधील पर्यटक तरुणीचा पाण्यात बुडून मृत्यू

तरुणी आपल्या मित्रांसोबत धबधब्यावर गेली असता ही दुर्घटना घडली

रायगडमध्ये धबधब्यावर पाय घसरुन पडल्याने पाण्यात बुडून तरुणीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. नेरळ टपालवाडी धबधबा येथे ही दुर्घटना घडली आहे. संजना शर्मा असं या तरुणीचं नाव असून ती कल्याणची रहिवासी होती. मिळालेल्या माहितीनुसार, संजना आपल्या मित्रांसोबत धबधब्यावर गेली असता ही दुर्घटना घडली. बुधवारी सकाळी ही दुर्घटना घडली होती. आज गुरुवारी सकाळी तिचा मृतदेह सापडला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

याआधी मुंबईतील ट्रॉम्बे येथून सहलीसाठी आलेल्या तीन तरुणांचा कुंडलिका नदीत बुडून मृत्यू झाला होता. त्यापूर्वी फणसाड धरणात रोह्य़ातून सहलीसाठी आलेल्या दोन भावंडाचा बुडून मृत्यू झाला होता. वारंवार घडणाऱ्या या दुर्घटनांमुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा प्रकर्षांने पुढे आला आहे. सुरक्षित वर्षा सहलींसाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे अशी मागणी वारंवार होत आहे.

रायगड पावसाळी पर्यटन : दुर्घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना आवश्यक

सहलीसाठी येणारे पर्यटक दुर्घटनांमध्ये दगावण्याचे प्रकार नवे नाहीत. गेल्या दोन वर्षांत ३५ हून अधिक पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला. यात प्रामुख्याने कर्जत, खोपोली, मुरुड आणि माणगाव पावसाळी पर्यटन केंद्रांवर या दुर्घटना घडल्या.

या दुर्घटनांना पर्यटकांचा आततायीपणा कारणीभूत ठरतो. मद्यपान करून पाण्यात उतरणे, स्थानिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे, भौगोलिक परिस्थितीचे ज्ञान नसणे यासारखे घटकही अपघातास कारणीभूत ठरत आहेत. जिल्ह्य़ात सातत्याने घडणाऱ्या या दुर्घटना लक्षात घेऊन माणगाव, कर्जत आणि खोपोली येथील पावसाळी पर्यटन केद्रांवर प्रवेशबंदी करण्यात आली. त्यावरून बराच गदारोळ झाला. पर्यटकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. स्थानिकांचे रोजगार बुडत असल्याने त्यांनीही यावर आक्षेप नोंदवला. अखेर प्रशासनाने ही बंदी मागे घेतली. यानंतर या ठिकाणांवर पर्यटकांना सूचना देणारे फलक लावण्यात आले. स्थानिकांच्या मदतीने येणाऱ्या पर्यटकांची नोंद ठेवण्याचे काम सुरू झाले. देवकुंड धबधब्यावर जाणाऱ्या पर्यटकांनी एक स्थानिक गाइड सोबत नेण्याची सूचना केली जाऊ लागली. मात्र पर्यटकांना हा जाच वाटू लागला. त्यामुळे स्थानिक विरुद्ध पर्यटक असे वादाचे प्रकार घडले.

जिल्ह्य़ात धरणांवर आणि धबधब्यांवर वर्षा सहलींसाठी येणाऱ्या पर्यटकांचे प्रमाणही मोठे आहे. पावसाचा जोर वाढल्यास या धरणांमधून आणि धबधब्यांमधून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढतो. त्याचा अंदाज न आल्याने पर्यटक वाहून जातात. समुद्रकिनाऱ्यावरील परिस्थिती काहीशी वेगळी असते. पर्यटकांना समुद्राला येणाऱ्या भरती-ओहोटीचा अंदाज नसतो. याशिवाय पाण्यातील अंतर्गत प्रवाहांची माहिती नसते. स्थानिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून पर्यटक खोल पाण्यात उतरतात आणि नंतर पाण्याचा अंदाज न आल्याने बुडतात.

ही परिस्थिती चिंताजनक आहे. निसर्गाच्या सान्निध्यात पर्यटनाचा आनंद लुटताना जीव धोक्यात येणार नाही याची खबरदारी घेणे आणि स्थानिक नागरिकांच्या सूचनांना गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. अन्यथा अशा दुर्घटना घडतच राहतील.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2019 2:05 pm

Web Title: raigad rain neral tapalwadi waterfall girl dies sgy 87
Next Stories
1 विधानसभेसाठी भाजपाची तयारी सुरू; 21 जुलैला महत्त्वपूर्ण बैठक
2 ‘चिखलफेक’ आंदोलन बाळासाहेब ठाकरेंना नक्की आवडलं असतं-नितेश राणे
3 कोयना धरण एकतृतीयांश भरले; प. महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पाऊस
Just Now!
X