05 June 2020

News Flash

घटिका समीप आली.. तटकरे की गीते?

रायगड लोकसभा निवडणुकीसाठीच्या निकालाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. राजकीय चर्चा आणि आडाख्यांना ऊत आला असून मतदारसंघातून शिवसेनेचे अनंत गीते की राष्ट्रवादीचे सुनील तटकरे विजयी

| May 16, 2014 02:48 am

रायगड लोकसभा निवडणुकीसाठीच्या निकालाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. राजकीय चर्चा आणि आडाख्यांना ऊत आला असून मतदारसंघातून शिवसेनेचे अनंत गीते की राष्ट्रवादीचे सुनील तटकरे विजयी होतात याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.
   लोकसभेच्या निकालांची घटिका आता समीप आली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून अलिबाग तालुक्यातील नेऊली येथे रायगड लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. तर दुपारी दोनपर्यंत मतदारसंघाचा निकाल अपेक्षित असणार आहे. स्थानिक निकालांबरोबरच राज्यातील तसेच देशातील निकालांकडे सर्वाचे लक्ष राहणार आहे.
   रायगड लोकसभा मतदारसंघाचा निकाल शिवसेनेबरोबरच एनडीएसाठी अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो आहे. कारण नरेंद्र मोदींच्या संभाव्य मंत्रिमंडळातील प्रमुख दावेदार असणारे अनंत गीते या मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत. गीते जर विजयी झाले तर त्यांची खासदार म्हणून सलग सहावी टर्म असणार आहे. त्यामुळेच त्यांच्या निकालाकडे सर्वाचे लक्ष्य असणार आहे. अनंत गीते यांनी यापूर्वीही केंद्रीय मंत्रिमंडळात काम केले आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी उर्जा केंद्रीय मंत्रालयाचा कारभार पाहिला आहे. एक शांत, संयमी आणि अभ्यासू खासदार म्हणूनही त्यांची ओळख आहे. लोकसभेच्या विविध कमिटय़ांवर काम करण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. लोकसभेच्या पिटिशन कमिटीचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. त्यामुळे त्यांच्या निकालाकडे सर्वाचे लक्ष लागून राहणार आहे. शेकापने शिवसेनेशी फारकत घेऊन त्यांच्या विजयात अडचणी निर्माण केल्या होत्या. त्याचा कितपत परिणाम झाला हे आज स्पष्ट होणार आहे.
   राज्याचे जलसंपदामंत्री सुनील तटकरे या निवडणुकीत अनंत गीते यांचे प्रतिस्पर्धी होते. त्यामुळे दोन तुल्यबळ उमेदवारांची लढत म्हणूनही या निवडणुकीकडे पाहिले गेले. राज्य मंत्रिमंडळातील हाय प्रोफाइल मंत्र्यांमध्ये तटकरे यांचा समावेश आहे. सलग चौदा वर्षे त्यांनी राज्य सरकारमध्ये मंत्रीपद उपभोगले आहे. नगरविकास राज्यमंत्री, अन्न नागरीपुरवठामंत्री, ऊर्जामंत्री, वित्त व नियोजनमंत्री आणि जलसंपदामंत्री अशी मोठमोठी खाती त्यांनी आजवर सांभाळली आहेत. वेगवेगळी खाती सांभाळताना त्यांनी आपल्या पदाचा जास्तीत जास्त फायदा रायगड आणि कोकणाला कसा होईल यासाठी प्रयत्न केला आहे. त्यामुळे रायगड आणि रत्नागिरीतील स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अंतुलेची नाराजी आणि भ्रष्टाचाराचे आरोप यामुळे तटकरे यांच्यासमोरील अडचणी वाढल्या असल्याचा दावा विरोधकांकडून केला गेला. मात्र याचा परिणाम तटकरे यांच्या मतांवर झाला का? हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.
     शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी रायगडात चमत्कार घडवण्याचा दावा केला आहे. राष्ट्रवादीच्या मुशीत वाढलेल्या रमेश कदम यांना उमेदवारी देऊन निवडणुकीत रंग आणण्याचा प्रयत्न केला. बॅरिस्टर अंतुले आणि रामदास कदम यांच्या नाराजीचा फायदा घेऊन त्यांनी एकाच वेळी तटकरे आणि गीते यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मनसेला हाताशी धरुन सेनेवर कुरघोडी केली आहे. मात्र या सर्व घटकांचा शेकापला मतपरिवर्तनासाठी कितपत फायदा झाला हेदेखील आज स्पष्ट होणार आहे.     एकूणच राज्यातील लक्षवेधी लढत म्हणून रायगडकडे पाहिले जाते आहे. या लक्षवेधी लढतीत तटकरे बाजी मारणार की गीते आपला गड कायम राखणार हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. कारण याच निकालावर रायगडातील पुढील राजकीय समीकरणे बांधली जाणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2014 2:48 am

Web Title: raigad sunil tatkare or anant gite
Next Stories
1 आजच्या निकालाने विधानसभेची समीकरणे स्पष्ट होतील!
2 सिंधुदुर्गात आघाडीचे वास्तव आज उघड होणार!
3 रायगड जिल्ह्य़ात भीषण पाणीटंचाई
Just Now!
X