पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न

तळं राखील तो पाणी चाखील अशी आपल्याकडे म्हण आहे परंतु राज्यातील दुष्काळी परिस्थितीत तळं खोदेल तो पाणी चाखेल, अशी म्हण आता रूढ होऊ लागली आहे. याचा प्रत्यय आणून देण्याचा प्रयत्न रायगडच्या पेण तालुक्यातील बोर्झे गावाने केला आहे

पाणीटंचाई पाचवीला पूजलेल्या पेणच्या खारेपाटातील बोर्झे गाव. या वर्षीच्या दुष्काळी स्थितीत टंचाईची झळ गावाला जरा जास्तच बसली. परंतु गावाने एकत्र येऊन गावच्या तळ्यातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले. विशेष म्हणजे त्यासाठी शासनाच्या अनेक योजना असताना त्याची वाट न पाहता ग्रामस्थांनी एकत्र येऊन लोकसहभागातून आणि दानशूर व्यक्तींच्या मदतीतून गेली ३५ वष्रे गाळाने भरलेल्या तलावातील गाळ काढून त्याची खोली वाढवली.

राज्यात या वर्षी अभूतपूर्व दुष्काळ आहे. कधी नव्हे ती याची झळ कोकणालाही बसली आहे. तालुक्यात हेटवणे धरण आहे परंतु त्याचे पाणी मुंबई, नवी मुंबईला जाते. त्यामुळे पेण तालुक्यातील गावे तहानलेलीच राहिलीत. बोर्झे गावात काही महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीने सरपंच महेंद्र ठाकूर यांच्या कल्पनेतून याच तलावातील पाण्यावर शुद्धीकरण प्रकल्प राबवून हे पाणी एटीएमच्या माध्यमातून गावाला पुरवले. परंतु मार्चअखेरीस तलाव कोरडाठाक पडला. काळाची पावलं ओळखत ग्रामस्थांनी गावतलावातील गाळ काढून त्याचे खोलीकरण केले. त्यातील झऱ्यांना वाट मोकळी करून दिली. पूर्वी या तलावाची पाणी साठवण क्षमता अडीच कोटी लिटर इतकी होती आता ती साडेसात कोटी लिटर इतकी झाली आहे. या कामासाठी गावातील काही व्यक्तींनी आपल्या नावावर कर्ज घेऊन निधी उभारणीत हातभार लावला आहे.

या प्रकल्पाचे शासन पातळीवरही कौतुक होतंय.पेणच्या प्रांताधिकारी प्रेमलता जैतू आणि तहसीलदार वंदना मकू यांनी गावाला भेट देऊन ग्रामस्थांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे. या कामासाठी आता मदतीचा हात पुढे करण्याचा मनोदय शासन पातळीवर व्यक्त होतोय. ग्रामस्थांनी केलेला हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. शासकीय योजनेतून त्यांना यासाठी लागणारे इंधन मिळवून देण्याचा प्रयत्न आहे शिवाय विविध कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून पाणी थोपवण्यासाठी लागणाऱ्या शीटस उपलब्ध करून देण्यात येतील, असे प्रांताधिकारी प्रेमलता जैतू यांनी सांगितले.

कोकणात दरवर्षी ३ हजार मिलिमीटर पाऊस पडतो परंतु ते साठवण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने ते सर्व समुद्राला जाऊन मिळते. बोर्झे गावासारखा उपक्रम खारेपाटातील अन्य गावांनी राबवला तर इथली पाणीटंचाई कायमची दूर होईल.