कोकण रेल्वे मार्गावर मंगला एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या तिघाजणांना गुंगीचे औषध देऊन लुबाडल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
एम. बालकृष्ण वायलपन्ना (वय ५९ वष्रे), जयश्री वायलपन्ना (वय ४९ वष्रे) आणि लिली कालरा (वय ४५ वष्रे, तिघेही रा. कोईमतूर). या तिघांनाही चिपळूणच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत ते बेशुद्धावस्थेत होते. त्यामुळे त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या ऐवजाबाबतचा तपशील कळू शकलेला नाही. प्रवाशी केरळचे आहेत. ते दिल्लीहून मंगला एक्स्प्रेसमध्ये बसले होते. दुपारी चारच्या सुमारास खेड रेल्वे स्थानकावर गाडी आली असता तिकीट तपासनीसाला तिघेजण बेशुद्धावस्थेत आढळले. त्यामुळे त्यांना चिपळूण स्थानकावर उतरवून तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या तिघांपैकी लिली कालरा अर्धवट शुद्धीत आली असता डॉक्टरांना मिळालेल्या माहितीनुसार, दोन अज्ञात व्यक्तींनी चहातून गुंगीचे औषध देऊन या प्रवाशांकडील ऐवज लुबाडला असावा, असा अंदाज आहे.