राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला आज संबोधित केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नांवर भाष्य करताना चिंता व्यक्त केली. त्याचबरोबर रेल्वे मंत्रालयाकडून मागणीपेक्षा कमी रेल्वेगाड्या सोडण्यात येत असल्याचं सांगत त्यांनी केंद्राकडून होणाऱ्या दिरंगाईवर टीका केली होती. उद्धव ठाकरे यांनी रेल्वेगाड्यांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर केंद्रीय रेल्वमंत्री पियूष गोयल यांनी लागलीच उद्धव ठाकरे यांना उत्तर दिलं. एका तासात आवश्यक माहिती द्या, तुम्हाला हव्या तितक्या रेल्वेगाड्या उपलब्ध करून देऊ,” असं उत्तर रेल्वेमंत्र्यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधकांकडून करण्यात असलेल्या पॅकेजची मागणी फेटाळून लावली. “स्थलांतरित मजुरांना घरी पोहोचवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असून, केंद्राकडून अपेक्षित रेल्वेगाड्या सोडल्या जात नाही. राज्य सरकारनं ८० रेल्वे गाड्यांची मागणी केली होती. मात्र, ३० ते ४० रेल्वे उपलब्ध करून दिल्या जात आहेत,” असं मुख्यमंत्री म्हणाले होते. मुख्यमंत्र्यांच्या या माहितीची रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी दखल घेतली आहे.

काय म्हणाले पियूष गोयल?

उद्धवजी, आशा आहे की तुमची प्रकृती चांगली आहे. तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा. उद्या आम्ही १२५ श्रमिक रेल्वेगाड्या देण्यास तयार आहोत. तुम्ही सांगितलं की, तुमच्याकडे मजुरांची यादी तयार आहे. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे. सर्व आवश्यक माहिती जसं की, रेल्वे गाडी कुठून सुटणार? रेल्वे गाड्यांनुसार मजुरांची यादी, त्यांची तपासणी केलेलं आरोग्य प्रमाणपत्र आणि रेल्वे कोठे जाणार? ही सर्व माहिती एका तासात मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना द्यावी, ही विनंती. त्यामुळे आम्हाला रेल्वेगाड्या वेळेनुसार सोडता येतील. आशा आहे की, यापूर्वीप्रमाणे गाडी रेल्वे स्थानकावर आल्यानंतर रिकामी जाऊ नये. तुम्हाला हव्या तितक्या रेल्वे गाड्या उपलब्ध करून दिल्या जातील, असं आश्वासनं रेल्वेमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं.

स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी अनेक राज्याकडून काम सुरू आहे. रेल्वे मंत्रालयाने श्रमिक रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत. राज्यांकडून या गाड्यांची मागणी केली जात आहे.