News Flash

रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा ; उद्योजक, कंत्राटदारावर गुन्हा नोंदवावा

केंद्र शासन व रेल्वे मंत्रालयाच्या उदासीन धोरणामुळे रेल्वे सोडण्यास विलंब झाला.

रेल्वे मंत्री पीयूष गोयल

जालन्यातून मागणी

जालना : जालन्यातील स्टिल उद्योगामध्ये काम करणाऱ्या १६ कामगारांचा गावी परतण्यासाठी निघाल्यानंतर मालगाडीच्या धडकेत शुक्रवारी पहाटे करमाडजवळ मृत्यू झाला. या घटनेनंतर रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्या राजीनाम्याची व उद्योजक, कामगारांच्या कंत्राटदाराविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी पुढे येत आहे.

शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी कामगारांच्या दुर्घटनेला रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांना जबाबदार धरत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. खोतकर म्हणाले,की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांची राज्य शासनाने सर्व व्यवस्था करून त्यांना मूळ गावी जाण्यासाठी केंद्राने रेल्वेची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. मात्र केंद्र शासन व रेल्वे मंत्रालयाच्या उदासीन धोरणामुळे रेल्वे सोडण्यास विलंब झाला. परिणामी गावी जाण्यासाठी व्यवस्था होत नसल्याने हतबल झालेल्या मजुरांनी रेल्वे रुळावरून पायपीट करत औरंगाबादकडे प्रस्थान केले. करमाड शिवारात कामगारांना रेल्वे प्रशासनाने पास सक्तीचा बडगा दाखवला. रेल्वे गाडय़ा मिळाल्या असत्या तर ही दुर्दैवी घटना टळली असती. त्यामुळे रेल्वेमंत्री गोयल यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी खोतकर यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली असून केंद्र सरकारने प्रत्येकी २५ लाख रुपये द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

यासंदर्भात कामगार ज्या कंपनीत कार्यरत होते तेथील प्रशासनाने म्हटले आहे, की घडलेली घटना दुर्दैवी आहे. मार्च २० तारखेला कंपनी बंद झाली होती. दोन दिवसांपूर्वीच सुरू झाली. मात्र, जे कामगार गुरुवारी निघाले तेव्हा त्यांनी कंपनी प्रशासनाला कुठलीही माहिती दिली नाही. यापुढेही कोणालाही जायचे असेल तर त्यांनी कंपनी प्रशासनाला सांगितल्यानंतर त्यांना जाण्याची परवानगी आम्ही देऊ.

आंतरराज्य कामगार कायद्याप्रमाणे मजुरांच्या राहण्याची व्यवस्था करणे आणि त्यांना घरी नेऊन सोडण्याची जबाबदारी संबंधित उद्योगाचे मालक आणि मजूर कंत्राटदाराची आहे. मृत कामगारांच्या मृत्यूमुळे या कायद्याचा भंग झाला आहे. त्यामुळे उद्योगाचा मालक आणि मजूर कंत्राटदाराच्याविरुद्ध गुन्हा नोंदवावा, अशी मागणी ‘सीटू’ कामगार संघटनेचे राज्य सचिव अण्णा सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. गावाकडे परतू इच्छिणाऱ्या कामगारांची व्यवस्था शासनाने करावी, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 2:17 am

Web Title: railway minister piyush goyal should resign former shiv sena minister arjun khotkar zws 70
Next Stories
1 गोपछडे यांच्या उमेदवारीमुळे नांदेड भाजपला सुखद धक्का
2 पालकमंत्री केदारांच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी
3 रत्नागिरी जिल्ह्यात आणखी चार करोनाबाधित रुग्ण
Just Now!
X