नाशिकमधील मनमाड रेल्वे स्थानकाच्या फलाटावर एका दिव्यांग भिकार्‍याला निर्दयीपणे मारहाण करणार्‍या जयकुमार तायडे या रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. रेल्वे पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांनी या घटनेची दखल घेत ही कारवाई केली.

सध्या थंडीचा कडाका वाढल्यामुळे काही भिकारी रेल्वे स्थानकात रात्रीच्यावेळी झोपतात. मंगळवारी (दि. १० जानेवारी) रेल्वे तिकीट बुकिंग कार्यालयाजवळ प्रवाशांसह काही भिकारी झोपले होते. यावेळी ड्युटीवर असलेल्या तायडे यांनी एका दिव्यांग भिकार्‍याला लाथाबुक्क्यांनी आणि काठीच्या सहाय्याने निर्दयीपणे मारहाण केली. तायडे यांनी केलेल्या या मारहाणीचा व्हिडिओदेखील सोशल मिडियाद्वारे सर्वत्र व्हायरल झाला होता.

या घटनेनंतर रेल्वे पोलीस निरीक्षक सी. डी. भाबल व उपअधिक्षक गौतम पवार यांनी याबाबतचा अहवाल राठोड यांना सादर केला. यानंतर जयकुमार तायडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.