पालघर : पालघर रेल्वे स्थानकाच्या आवारात तसेच कर्मचाऱ्यांच्या रहिवासी परिसरात उभ्या केलेल्या दुचाकींना ग्रीस लावून विद्रूपीकरण करण्याचा प्रकार पालघरमध्ये घडला आहे. यामागे नेमका कोणाचा हात आहे त्याबद्दल प्रवाशांमधून वेगवेगळे प्रवाह पुढे येत आहेत.

रेल्वे स्थानकाच्या आवारात काही प्रवासी आपल्या दुचाकी उभ्या करून कामानिमित्ताने जात असतात. रेल्वे स्थानकाच्या आवारामध्ये कोणत्याही प्रकारची वाहने उभी करण्यास मज्जाव असून यासाठी रेल्वेच्या आवारामध्ये पे अँड पार्क उभी करण्यात आली आहेत. असे असतानादेखील काही प्रवासी रेल्वे स्थानकाच्या आवारामध्ये दुचाकी उभी करत असल्याने अज्ञात व्यक्तीने अशा दुचाकीवर ग्रीस लावून विद्रूपीकरण करण्याचा प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे.

दुचाकीच्या हँडलवर तसेच सीट व इतर भागांना ग्रीस लावल्याने वाहन चालविताना कपडे खराब झाले. हा प्रकार पोलिसांनी केला की पे अँड पार्क ठेकेदाराच्या माणसांनी केला याबाबत प्रवाशांकडून संशय व्यक्त होत आहे. घडलेल्या प्रकाराबाबत प्रवाशांकडून समाजमाध्यमांवर संताप व्यक्त होत आहे. पालघर रेल्वे स्थानकाच्या आवारात भरपूर जागा उपलब्ध असताना तसेच रिक्षांना उभे राहण्याची सुविधा असताना दुचाकी ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने आपली वाहने ठेवायची कुठे, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.