परराज्यातील मजुरांना त्यांच्या राज्यात परतण्यासाठी आणि इतर राज्यात अडकलेल्या मजुरांना महाराष्ट्रात येण्यासाठी रेल्वे प्रवासाचे पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटरद्वारे याबाबतची माहिती दिली.

“परराज्यातील मजूर त्यांच्या राज्यात परतत आहेत तसेच महाराष्ट्रातले मजूर इतर राज्यातून येत आहेत. त्यांच्याकडे रेल्वे प्रवासाची रक्कम भरण्यासाठी पैसे नाहीत ही गोष्ट लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून तिकिटाचे शुल्क भरण्याचा निर्णय घेतला आहे”. अशी माहिती ट्विटरद्वारे देण्यात आली आहे. परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या आणि परराज्यात जाणाऱ्या मजुरांचे रेल्वेभाडे मुख्यमंत्री सहायता निधीतून भरण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. या मजुरांकडे रेल्वे प्रवासाला लागणारे भाडे देण्यासाठी पैसे नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. संबंधित जिल्हाधिकारी यांना त्यांच्या मागणीप्रमाणे ही रक्कम निधीतून वर्ग करण्यात येईल.

यावरुन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. ” महाविकासआघाडी सरकारने स्थलांतरित मजुरांच्या रेल्वे यात्रेचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्याचा निर्णय घेतला आहे. संवेदना आणि सहवेदना या प्रत्येक सत्ताधाऱ्यांना असाव्यात. परंतु रेल्वे तिकीटाची ८५% रक्कम देऊ असे खोटं सांगणाऱ्या भाजपा नेत्यांचे हृदय निष्ठूर आहे”, अशी टीका त्यांनी ट्विटरद्वारे केली.

दरम्यान, राज्यांर्तगत आणि परराज्यातून राज्यात येऊ इच्छिणाऱ्या व जाणाऱ्या मजूर, कामगार, विद्यार्थी व इतर नागरिकांसाठी एसटीची मोफत प्रवाससुविधा देण्याचा निर्णय मदत व पुनर्वसन विभागाने रविवारी फिरवला. मोफत प्रवास केवळ राज्यात विविध ठिकाणी अडकलेले मजूर व नागरिकांना महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत घेऊन जाणे आणि महाराष्ट्रातील मजूर व अन्य रहिवासी जे इतर राज्यात अडकले आहेत त्यांना महाराष्ट्राची सीमा ते जिल्ह्य़ांर्तगत प्रवासासाठी असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.