मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात लवकरच भुसावळ-नांदगाव आणि नांदगाव-नाशिक अशी लोकलच्या धर्तीवर रेल्वे सेवा सुरू होणार आहे. सध्या उपलब्ध गाडीची महिनाभर चाचणी घेतल्यानंतर वेळापत्रकानुसार ही गाडी धावेल, अशी माहिती भुसावळ विभागाचे मंडळ रेल्वे प्रबंधक सुधीर गुप्ता यांनी येथे दिली.
या गाडीची चाचणी झाल्यानंतर वेळापत्रकानुसार भुसावळ ते नांदगाव दरम्यान धावणारी मेमू नांदगाव येथून अर्धा ते एक तासानंतर नाशिककडे रवाना होईल.
याप्रमाणेच परतीचा मार्ग राहणार आहे. मिळणाऱ्या प्रतिसादावर या रेल्वे गाडीचे पुढील भवितव्य अवलंबून राहील. अशा प्रकारची गाडी कायमस्वरुपी भुसावळ विभागातील विविध ठिकाणी चालविण्याचा प्रयत्न असून त्यानुसार येथील चालकांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती गुप्ता यांनी दिली.
गुप्ता हे नुकतेच भारतीय रेल्वेच्या ३० मंडळ रेल्वे प्रबंधकांसोबत इटली येथील व्यवस्थापन अभ्यासक्रमातंर्गत नेतृत्वासंदर्भातील दोन आठवडय़ांचे प्रशिक्षण पूर्ण करून आले. या प्रशिक्षणाविषयीही त्यांनी माहिती दिली. इटलीमध्ये मूलभूत सोयी सुविधा भारतापेक्षा अधिक आहेत. इटलीत स्वच्छता अधिक असली तरी स्त्री-पुरूषांमधील धूम्रपानाचे प्रमाण भारतीयांपेक्षा अधिक आहे. इटलीत एकदा रेल्वेचे तिकीट घेतले की बस, ट्राम किंवा टॅक्सीचे वेगळे तिकीट काढावे लागत नाही. भारतात चेन्नई रेल्वे स्थानकावर प्रायोगिक तत्वावर ही सेवा सुरू करण्यात आली आहे. ही योजना यशस्वी झाल्यास तिचा विस्तार दिल्ली, मुंबई, कोलकाता, यासारख्या मोठय़ा शहरात सुरू करण्यात येणार असल्याचेही गुप्ता यांनी सांगितले.
भुसावळ येथील पादचारी पूल डिसेंबपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी नमूद केले.