26 October 2020

News Flash

वाढीववासीयांचा प्रवास सुखकर?

सफाळे व वैतरणा या दोन रेल्वे स्थानकांदरम्यान असलेल्या वाढीव बेटावरील नागरिकांना वेगवेगळ्या कारणास्तव बाहेर जाण्यासाठी रेल्वेमार्गाचाच वापर करावा लागतो.

रेल्वे पदपथ, द्रुतगती मालवाहू मार्गाच्या पुलाचा वापर करण्यास परवानगी मिळवण्याचा प्रयत्न

पालघर जिल्ह्य़ातील वाढीव या तीन हजार लोकवस्तीच्या बेटावरील नागरिकांना वैतरणा येथे जाण्याकरिता नव्याने उभारण्यात येणाऱ्या रेल्वे पदपथाचा वापर करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी पालघर जिल्हा प्रशासनाकडून रेल्वे प्रशासनाकडे परवानगी मागितली जाणार आहे. त्याचप्रमाणे त्यालगत उभारण्यात येणाऱ्या द्रुतगती मालवाहू मार्गाच्या (डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर) काँक्रीट पुलावरूनही येथील रहिवाशांना वापर करण्याची परवानगी मिळण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहेत. या परवानग्या मिळाल्या तर वाढीववासीयांचा प्रवास सुखकर होणार आहे.

माहा चक्रीवादळाच्या अनुषंगाने आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सर्व संबंधित विभागाची बैठक घेतली होती. या बैठकीनंतर उपस्थित वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांसोबत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली.

सफाळे व वैतरणा या दोन रेल्वे स्थानकांदरम्यान असलेल्या वाढीव बेटावरील नागरिकांना वेगवेगळ्या कारणास्तव बाहेर जाण्यासाठी रेल्वेमार्गाचाच वापर करावा लागतो. याकरिता सध्या कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने पश्चिम रेल्वेच्या पुलावरील मध्यभागी असलेल्या लोखंडी पट्टय़ावरून हे नागरिक प्रवास करत असतात. अशा वेळी दोन्ही दिशेने गाडय़ा आल्या तर वाऱ्याच्या प्रवाहामुळे तसेच दोन गाडय़ांच्या मधोमध उभे राहिल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण होऊन अपघात होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. गेल्या चार महिन्यांमध्ये पाच नागरिकांना या पुलावर आपले प्राण गमवावे लागले आहेत.

तीन हजार लोकसंख्येच्या या बेटाकरिता जिल्हा प्रशासनाने एक होडी वाहतुकीसाठी दिली आहे. मात्र होडीमधून प्रवास केल्यानंतर रेल्वे स्थानक गाठण्यासाठी मोठे अंतर कापावे लागत असल्याने वाढीव बेटावरील नागरिक आपला जीव मुठीत धरून रेल्वेमार्गालगत असलेल्या पुलावरून प्रवास करणेच पसंत करताना दिसतात. जिल्हा प्रशासनामार्फत लहान लोकवस्तीसाठी स्वतंत्रपणे वैतरणा नदीवर उड्डाणपूल उभारण्याकरिता कोटय़वधी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळणे कठीण दिसत असल्याने जिल्हा प्रशासनातर्फे इतर पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. रेल्वे प्रशासनामार्फत पूल क्रमांक ९१ व ९२ यांवर दोन रुळांच्या मधोमध असलेल्या मार्गाखेरीज पुलाच्या एका बाजूला साइड पाथ वे अर्थात पदपथ निर्माण करण्याचे काम हाती घेतले आहे. या मार्गाचा वापर रेल्वे रुळाच्या देखभाल-दुरुस्ती काम करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांना होणार आहे. सध्याचा रेल्वे पुलाचा वापर सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रतिबंधित असून जिल्हा प्रशासनाने रेल्वेकडे विशेष बाब म्हणून मागणी केल्यास या पदपथाचा वापर वाढीवच्या नागरिकांना करणे शक्य होईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

परवानगीसाठी हालचाली

पश्चिम रेल्वेच्या या पुलाच्या पदपथासह या पुलाच्या पूर्वेच्या बाजूला उभारण्यात येणाऱ्या द्रुतगती मालवाहू मार्गाच्या नव्याने उभारण्यात येणाऱ्या काँक्रीट पुलावरून वाढीव येथील रहिवाशांना सुखरूप प्रवास करता यावा याकरिता परवानगी घेण्याचे प्रयत्न सुरू असून या दोन्ही पुलाच्या कडेला उभारण्यात येणाऱ्या पदपथांवरून वाढीव नागरिकांना प्रवास करण्यासाठी परवानगी मिळाल्यास येथील नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2019 1:29 am

Web Title: railway travel safe journey akp 94
Next Stories
1 भातशेती नुकसानीचा कृषीपूरक व्यावसायांना फटका
2 ठाकरे कलादालनावरून शिवसेना पुन्हा आक्रमक
3 मच्छीमारांना अनुदानाची प्रतीक्षा
Just Now!
X