यंदा हंगामात प्रथमच सलग ६ तास मुसळधार पाऊस बरसला. सहा तासात उस्मानाबादेत १५२ मिमी पावसाची नोंद झाली. उस्मानाबाद, तुळजापूर व कळंब तालुक्यात सोमवारी रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. उमरगा, लोहारा, भूम, परंडा व वाशी या ५ तालुक्यात तुरळक पाऊस पडला. उस्मानाबाद शहरात वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसात मोठे नुकसान झाले. जिल्ह्यात ११.३९ मिमी पाऊस झाला. उस्मानाबादमध्ये सर्वाधिक ५२.१०, तर कळंब व तुळजापूर तालुक्यात १२ मिमी पावसाची नोंद झाली.
मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. रविवारी जिल्हाभर हलका पाऊस झाला. मात्र, सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास उस्मानाबाद, तुळजापूर व कळंब तालुक्यात पावसाने दमदार बरसात केली. उस्मानाबाद शहरात वादळी वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे पोलीस मुख्यालय परिसर, बसस्थानक, पंचायत समिती, तेरणा महाविद्यालय व शेकापूर परिसरातील झाडे पडली. मध्यरात्रीपर्यंत उस्मानाबाद शहर व परिसरात पावसाचे थमान सुरू होते.
शहरातील छत्रपती शिवाजी चौकात संजीवन रुग्णालयाखालील रक्त साठवणूक केंद्रात जवळपास १२ फुटांपर्यंत पाणी साठले होते. रक्त साठवणूक केंद्रातील महागडय़ा अत्याधुनिक यंत्रांचे मोठे नुकसान झाले. साठवून ठेवलेल्या रक्ताच्या पिशव्या पाण्याबरोबर वाहून गेल्या. तसेच केंद्रालगत प्रयोगशाळेतही पाणी शिरल्याने महागडे अत्याधुनिक यंत्र, इलेक्ट्रॉनिक साहित्य, बॅटऱ्या, इन्व्हर्टर, रजिस्टर, महत्त्वाची कागदपत्रेही पाण्यात भिजून जवळपास १७ ते २० लाखांचे नुकसान झाले.
मध्यरात्रीच्या सुमारास पालिकेच्या अग्निशमन दलास पाचारण करून रक्त साठवणूक केंद्र व प्रयोगशाळेतील पाणी काढण्यात आले. पहाटेपर्यंत रुग्णालयाच्या डॉ. स्मिता शहापूरकर, डॉ. जिंतूरकर व बार्शी येथील श्रीमान रामभाई शाहू रक्तपेढीच्या उस्मानाबाद रक्त साठवणूक केंद्राच्या डॉ. श्रद्धा मुळे, गोरे लॅबोरेटरीचे डॉ. गोरे यांच्यासह नागरिकांनी परिश्रम घेतले. अत्याधुनिक यंत्रसामग्रीत पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले.
उस्मानाबादच्या मध्यवर्ती बसस्थानक प्रवेशद्वारालगत असलेले झाड वादळी वाऱ्यात पडले. या झाडाखाली लावलेल्या दोन मोटारसायकलींचे मोठे नुकसान झाले. पंचायत समितीच्या मागील बाजूने असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासमोरील झाड पडल्याने विजेचे खांब वाकले. वीज खंडित केल्याने मोठा अनर्थ टळला. शहर परिसरात वादळी वारे, मुसळधार पावसाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.
ऊसतोड कामगारांचे हाल
उस्मानाबाद तालुक्यातील देवळाली, मेडसिंगा, बेंबळी, रूईभर, वाघोली, केशेगाव परिसरासही पावसाने झोडपले. या पावसाने ऊसतोड करण्यासाठी फडात आलेल्या ऊसतोड कामगारांचे तंबू वादळी वाऱ्याने उडाल्याने त्यांच्या अन्नधान्याचे मोठे नुकसान झाले. ऊसतोड कामगारांनी शेताच्या बांधावर आपल्या लहान-मुलांसह रात्र भिजत जागून काढली. वादळी वारे, विजेचा कडकडाट यामुळे ऊसतोड कामगारांनी आपला जीव मुठीत धरून रात्र जागली.
जिल्ह्यात ११.३९ मिमी पाऊस
उस्मानाबाद शहर परिसरात सर्वाधिक ५२.१० मिमी पाऊस झाला. तुळजापूर व कळंबमध्ये १२ मिमी पाऊस झाला. लोहारा ५.७०, उमरगा ३, परंडा ०.४०, वाशी ३.७०, भूम २.२० मिमी पाऊस झाला. जिल्ह्यात एकूण ११.३९ मिमी पावसाची नोंद झाली. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ४५५.९ मिमी पावसाची नोंद झाली.