रत्नागिरी : मुसळधार पाऊस आणि समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांनी रत्नागिरी जिल्ह्य़ाला रविवारीही जोरदार दणका दिला. जिल्ह्य़ात काही ठिकाणी घरे किंवा गोठय़ांवर झाडे पडून मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान आगामी चोवीस तासांत मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेने व्यक्त आहे.

रत्नागिरी शहराची चौपाटी मानली जाणाऱ्या मांडवी जेटीच्या नव्याने केलेल्या सुशोभीकरणाला भरतीचा लाटांचा तडाखा बसला आहे. तसेच जेटीचा भरावही वाहून गेला आहे. उधाणाच्या लाटा जेटीला धडकत असल्यामुळे पर्यटकांसाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे. येथे पोलीस कर्मचारी तनात करण्यात आले आहेत.

या उधाणाचा फटका रत्नागिरीतील अनेक किनारपट्टी भागांनाही बसला.  काही ठिकाणच्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांना भगदाड पडले. भाटय़ेकिनारी अनेक ठिकाणी वाळूची मोठय़ा प्रमाणात धूप झाली असून, सुरूची झाडे उन्मळून पडली आहेत. लाटांचा तडाखा मांडवी आणि मिर्या किनारपट्टीलाही बसला. मांडवी येथे काही घरांच्या अंगणात समुद्राचे पाणी आले होते.

पंधरामाड येथील धूपप्रतिबंधक बंधाऱ्याला दोन ठिकाणी भगदाड पडले असून, येथील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. काही ठिकाणी बंधाऱ्यावरून पाणी नारळाच्या बागेत शिरत असून, जवळच असणाऱ्या घरांनाही धोका निर्माण झाला आहे.

रत्नागिरी तालुक्यात मौजे मिर्या येथे पांढऱ्या समुद्राजवळच्या महापुरुष मंदिरपाशी झाड रस्त्यात पडल्याने वाहतूक काही काळ बंद पडली होती. गुहागर तालुक्यात मौजे कोंडगारुळ येथे समुद्राचे पाणी वस्तीमध्ये शिरल्याने अंशत: नुकसान झाले आहे.

दरम्यान रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासात जिल्ह्य़ात  सरासरी ४६.२२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्य़ातील संगमेश्वर (११७ मिली) आणि लांजा (११० मिली) तालुक्यात सर्वात जास्त पाऊस पडला.