वीज पडून विविध भागांत १४  मृत्युमुखी; मुंबईतील काहिलीवर धारांचा उतारा

अरबी समुद्रात पूर्व-मध्य भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने मुंबईसह कोल्हापूर, पुणे आणि महाबळेश्वरसह शुक्रवारी दुपारपासून पश्चिम महाराष्ट्रात जोरदार वादळी पाऊस झाला. सोलापूरमध्ये वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला. नगरमध्येही पावसाशी संबंधित अपघातात दोन जण दगावले. वाशीम जिल्ह्य़ात शुक्रवारी झालेल्या पावसात वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला. नाशिकमध्ये वीज पडून एकाचा, लातूरमध्ये तिघांचा तर परभणीत तिघांचा मृत्यू झाला. दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून उन्हाच्या चटक्यांनी ग्रासलेल्या मुंबईकरांना धारांचा उतारा लाभला.

सुटीचा दिवस असल्यामुळे परतीच्या पावसात भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी अनेक मुंबईकरांनी संध्याकाळी समुद्रकिनाऱ्यांवर धाव घेतली. मुंबईमध्ये लागू करण्यात आलेली २० टक्के पाणी कपात तूर्तास ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय पालिकेच्या जल विभागाने घेतला आहे. पाऊस आणखी काही दिवस मुंबई आणि आसपासच्या शहरांत मुक्कामी राहिल्यास मुंबईत जारी करण्यात येणारी पाणी कपात मागे घेता येईल, असे जल विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, ठाण्यामध्ये पावसामुळे झाडाच्या फांद्या तुटल्याच्या घटना घडल्या. तर कल्याण-डोंबिवलीमध्ये काहीकाळ वीज पुरवठा खंडीत झाला होता. कल्याण, डोंबिवली, बदलापूर  यांसोबत काही ठिकाणी जोरदार वीज पडल्याच्या घटना घडल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले.

 

राज्यात मुसळधार

रायगड जिल्ह्य़ातील बहुतांश भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली. त्यामुळे काही ठिकाणचा वीजपुरवठाही खंडीत झाला आहे. महाड, पोलादपूर, माणगाव, श्रीवर्धन, रोहा, पेण आणि अलिबाग परिसर पावसाने धुऊन काढला.

रत्नागिरी शहरासह जिल्ह्य़ाच्या निम्म्याहून जास्त भागाला मान्सूनच्या परतीच्या पावसाचा दणका बसत असून, यंदाच्या मोसमात एकूण सरासरी २२०२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

गेल्या २४ तासात जिल्ह्य़ातील लांजा (६४.७० मिमी), संगमेश्वर (४०.५८ मिमी), राजापूर (२५.८७ मिमी) आणि रत्नागिरी (१७.१७ मिमी) या तालुक्यांमध्ये चांगला पाऊस पडला.

पुण्यात शुक्रवारी २०.०० मिमी (२ सें.मी.) इतक्या पावसाची नोंद झाली. कोल्हापूरला पुण्यापेक्षाही जास्त म्हणजे ३ सें.मी. पावसाची नोंद झाली आहे, तर महाबळेश्वर येथे २ सें.मी. पाऊस नोंदवला गेला.

सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्य़ातही गुरुवार रात्रीपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. सांगली, साताऱ्यातील वाई, महाबळेश्वर परिसरात पावसाचा जोर खूप होता. महाबळेश्वर परिसरात वादळी पावसात अनेक घरांचे पत्रेही उडाले आहेत.

अरबी समुद्रात पूर्व-मध्य भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे शुक्रवारी कर्नाटक, गोव्यासह कोकणपट्टी आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाने जोर धरला होता. हाच प्रभाव मुंबईवरही दिसत आहे. हा केवळ मान्सून माघारी जाणारा पाऊस नाही

– कृष्णानंद होसाळीकर, उपमहासंचालक, मुंबई हवामानशास्त्र विभाग