06 April 2020

News Flash

पावसामुळे बीड जिल्ह्य़ात पेरणीसाठी आशादायी चित्र

महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर सोमवारी सायंकाळी जिल्ह्य़ात पावसाचे आगमन झाले. मंगळवारी सायंकाळीही पाऊस झाला. रोहिणी, मृग, आद्र्रा नक्षत्रे कोरडी गेल्याने खरीप पिकांच्या पेरण्या लांबल्याने शेतकरी हवालदिल झाला

| July 9, 2014 01:55 am

महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर सोमवारी सायंकाळी जिल्ह्य़ात पावसाचे आगमन झाले. मंगळवारी सायंकाळीही पाऊस झाला. रोहिणी, मृग, आद्र्रा नक्षत्रे कोरडी गेल्याने खरीप पिकांच्या पेरण्या लांबल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. पुनर्वसू नक्षत्रात मात्र पावसाने दिलासा दिल्यामुळे पेरणीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. वडवणीत सर्वाधिक ४४ मिमी पाऊस झाला. जिल्हय़ात सरासरी २१ मिमी पावसाची नोंद झाली.
जिल्हय़ात मागच्या वर्षी दुष्काळाची दाहकता संपताच रब्बी मोसमात गारपिटीने झोडपले. खरीप पेरण्यांना वेळेवर पाऊस येईल, या आशेवर आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना पावसाने वाकुल्या दाखविल्या. ७ जूनला मृग नक्षत्र सुरू होऊन महिना संपला तरी पाऊस आला नाही. पंढरपूरची वारी फिरल्यानंतरच पाऊस येईल, अशी आशा होती. महिनाभरात केवळ दोन टक्केच पेरण्या झाल्या. सोमवारी सायंकाळनंतर जिल्हय़ात सर्वदूर पावसाचे आगमन झाले. सर्वाधिक पाऊस वडवणी तालुक्यात ४४.५० मिमी झाला. अंबाजोगाई ३८.६०, पाटोदा १७, बीड २५, माजलगाव २९.५०, केज २२.१०, धारुर २४.३६, परळी २५ मिमी पाऊस झाला. आष्टी, गेवराई व शिरूर तालुक्यांत कमी पाऊस झाला. पहिल्याच पावसात वडवणीत बाजारपेठ असलेल्या सखल भागात पाणी घुसल्याने दुकानदारांचे नुकसान झाले. बीड शहरातही नगरपालिकेच्या नालीसफाईचे पितळ उघडे पडले.
पावसाच्या आगमनामुळे परभणीकरांना समाधान
वार्ताहर, परभणी
मंगळवारी दुपापर्यंतच्या असह्य उकाडय़ानंतर पावसाने दुपारी चारच्या सुमारास जोरदार हजेरी लावली. पावसाच्या आगमनामुळे सर्वत्र समाधानाची भावना निर्माण झाली.
दोन दिवसांपूर्वी सेलू, पाथरी, मानवत भागात पाऊस झाला होता. दुपारनंतर परभणी शहरात पावसाचे आगमन झाले. पावसात जोमही बऱ्यापकी होता. सुमारे अर्धातास हा पाऊस झाला. अर्थात, एक-दोन पावसाने प्रश्न मिटणार नाही. शेतक ऱ्यांना अधिक पावसाची अपेक्षा आहे. जिंतूर तालुक्यातही पाऊस झाला. जुलचा पहिला आठवडा लोटला, तरीही पाऊस पडत नसल्यामुळे काही भागात पेरण्याच झाल्या नाहीत. विशेषत: मूग, उडीद पिकांची पेरणी झालीच नाही. सोयाबीनची पेरणीही संकटात सापडली. पाऊस नाही व बाजारात सोयाबीन बियाणेही उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. पावसासाठी ग्रामदैवतेला जलाभिषेक ते बेडकाचे लग्न असे सर्व उपाय शेतकरी करू लागले होते. पावसाने ताण दिल्याने अनेक भागात पेरण्या खोळंबल्या होत्या. त्या मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.
पावसाने रुसवा सोडल्याने लातूरकर शेतकरी आनंदले
वार्ताहर, लातूर
पुनर्वसू नक्षत्राच्या सलग दुसऱ्या दिवशी वरुणराजा बरसल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. पावसाचे अनुकूल वातावरण लक्षात घेऊन पेरणीने चांगलाच वेग घेतला आहे.
गेला महिनाभर पाऊस गायब झाल्याने शेतकरी चिंताक्रांत होता. सोमवारपासून मात्र कमीअधिक प्रमाणात जिल्हाभर झालेल्या पावसामुळे खरिपाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली आहे. सकाळपासून बाजारपेठेत बी-बियाणे व खताची खरेदी सुरू झाली होती. गेले काही दिवस बी-बियाणे व खतांच्या दुकानात दिवसभर अजिबात विक्री होत नव्हती. आता पावसाने दिलासा दिल्यामुळे सगळीकडे आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे.
मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्हय़ात सरासरी २४.३९ मिमी पाऊस झाल्यामुळे जिल्हय़ाची सरासरी आता ८९.३९ मिमीवर पोहोचली आहे. तालुकानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे- कंसातील आकडे आतापर्यंतच्या एकूण पावसाचे मिमीमध्ये- लातूर २८.५० (७७.६), औसा १४.७१ (५४.३९), रेणापूर १३.७५ (५१), उदगीर ४६.७१ (९२.७७), अहमदपूर ४.६६ (५४.५६), चाकूर २८.८० (८५.२), जळकोट ४०.५० (६६), निलंगा १४.६२ (९६.०८), देवणी १६ (१५१.९७), शिरूर अनंतपाळ ३५.६६ (१६४.२३).

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2014 1:55 am

Web Title: rain beed parbhani latur
टॅग Beed,Latur,Parbhani
Next Stories
1 ‘राज्यातील आरोग्य सेवेचे पंतप्रधानांकडून कौतुक’
2 ‘पीएमडी’च्या संचालकांना ११ दिवस पोलीस कोठडी
3 आत्महत्या केलेल्या ९२ पैकी ४५ शेतकरी कुटुंबीयांना मदत
Just Now!
X