गेल्या काही दिवसांपासून पश्चिम विदर्भात ढगांनी उन-सावलीचा खेळ चालवला असून रात्रीच्या सरींनी काही प्रमाणात गारवा निर्माण केला असला, तरी उकाडय़ापासून वऱ्हाडवासीयांची पूर्णपणे सुटका झालेली नाही. गेल्या चोवीस तासात अमरावती विभागात सर्वाधिक ९८ मि.मी. पावसाची नोंद वाशीम शहरात करण्यात आली. गेल्या १ जूनपासून आतापर्यंत विभागात पावसाचे दिवस सरासरी सहा ते सात आहेत.
गेल्या ११ जूनपासून विदर्भात पावसाने सर्वदूर हजेरी लावली असली, तरी पावसाचे प्रमाण सरारीपेक्षा कमी आहे. आतापर्यंत अमरावती जिल्ह्यात ४७.२ टक्के, अकोला ४९.१ टक्के, बुलढाणा ४४.३ टक्के, वाशीम ६७.२ टक्के, तर यवतमाळ जिल्ह्यात २१.५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. दिवसभर उन आणि रात्री जोरदार पाऊस असा अनुभव काल अमरावतीकरांनी घेतला. दिवसाचे कमाल तापमान ३४.८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले असताना सायंकाळी आकाशात ढगांनी गर्दी केली आणि रात्री जोरदार पाऊस बरसला. अमरावती शहरात सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६३ मि.मी. पावसाची नोंद झाली. किमान तापमान २१.२ अंश सेल्सिअस इतके होते.
अकोला शहरात १५.६ मि.मी., बुलढाणा शहरात ७.० मि.मी. वाशीम ९८.० मि.मी. तर यवतमाळ शहरात १.० मि.मी. पावसाची नोंद झाली. उन्हाळ्याच्या तुलनेत दिवसाच्या तापमानात घट झाली असली, तरी आर्द्रतेमुळे उकाडा जाणवतच आहे. पावसाच्या सरी तात्पुरता दिलासा मिळवून देतात. अजूनपर्यंत मान्सून सक्रिय न झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्यांच्या कामांना सुरुवात केलेली नाही. येत्या काही दिवसात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांनी पेरणीसाठी वाट पाहणेच पसंत केले आहे.