जिल्ह्यात पडणाऱ्या पावसाचा जोर शनिवारीही कायम राहिला असून जिल्ह्यातील नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडू लागले आहे. पंचगंगा नदीच्या पातळीत झपाटय़ाने वाढ झाल्याने नदीचे पाणी यंदा प्रथमच पात्राबाहेर पडले. जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत असून पंचगंगा, वारणा नदीपात्रातील पाणी पात्राबाहेर गेल्यामुळे  २२ बंधारे पाण्याखाली असून, ८ मार्ग अंशत बंद आहेत. राधानगरी धरण क्षेत्रात जोराचा पाऊस होत असून, हे धरण ५० टक्के भरले आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. शेतीकामाला वेग आला असून शिवारे फुलून गेली आहेत. दुबार पेरणीचे संकट दूर झाल्याने शेतकरी व प्रशासनाने सुटकेचा सुस्कारा सोडला आहे.
आठवडाभर जिल्ह्यात सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात आंबा, चांदोली, करुळ घाट, गगनबावडा, आंबा आदी भागात अतिवृष्टी सुरू आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिला असून पाणीसाठय़ात झपाटय़ाने वाढ होत आहे. काळम्मावाडी धरण क्षेत्रात ५० मि.मी. पावसाची नोंद झाली. कोदे लघु पाटबंधारा ओसंडून वाहत आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागातील ओढय़ानाल्यांना पूरसदृश्य स्थिती असून वारणा, पंचगंगा नदीपात्रातील पाणी बाहेर आले आहे. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक १६१ मि.मी. पावसाची नोंद झाली.  गेल्या चोवीस तासांत सरासरी ३७.१८ मि. मी. इतका पाऊस झाला तर १ जूनपासून आजअखेर सरासरी ४४९.८१ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
२२ बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या जून २०१४ पासूनच्या पावसाने  कोदे लघुपाटबंधारे आणि घटप्रभा धरणांची पातळी  शंभर टक्के पूर्ण झाली असून २२ बंधारे पाण्याखाली असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
एस.टी.  मार्ग अंशत बंद
जिल्ह्यात झालेल्या काही ठिकाणच्या अतिवृष्टीमुळे तसेच कच्च्या रस्त्याचे निसरडे, खराब रस्ता, धरणाचे पाणी रस्त्यावर आल्याने राज्य परिवहन मंडळाकडून जिल्ह्यातील एकूण ८ मार्ग अंशत बंद  तर ४ मार्गाने पर्यायी वाहतूक चालू ठेवण्यात आली आहे. संभाजीनगर आगाराच्या रंकाळा स्टँडपासूनच्या  मानबेट, गोतेवाडी, गांवडी, बुरुंबाळ, कदमवाडी, गारगोटी पासून भुदरगड किल्ला, हेळेवाडी आणि मलकापूर उदगीरकडे जाणाऱ्या गाडय़ाही कच्चा रस्ता, पावसामुळे झालेले निसरडे अशा कारणांने अंशत बंद करण्यात आल्या आहेत. तर रंकाळा स्टॅण्डपासून स्वयंभुवाडी, कागल पासून मुरगूड, मुदाळतिट्टा, नंद्याळ या चार मार्गावरून जाणाऱ्या गाडय़ांसाठी पर्यायी मार्ग सुरू करण्यात.