राज्यातील विविध भागात पावसाने दमदार सुरुवात केली आहे. पश्चिम महाराष्ट्रासह कोकण विदर्भातही पावसाने दमदार हजेरी लावली. राज्यात काही भागात पावसामुळे पूरजन्य परिस्थितीची भीती निर्माण झाली असताना पुणे हवामान खात्याने बुधवारी पावसाचा जोर कमी होणार असल्याचे संकेत  दिले आहेत. पुणे हवामान विभागाने वर्तविलेला हा अंदाज पूरजन्य परिस्थीतीतीने जनजीवन विस्कळीत झालेल्या नागरिकांसाठी दिलासा देणारा आहे. मात्र, मराठवाड्यातील नागरिक या पावसाने सुखावलेले नाहीत. मराठवाड्यातील मोठे प्रकल्प अजूनही रिकामेच आहेत. जायकवाडी प्रकल्पातील पाणीसाठा केवळ एक टक्क्यानी वाढला आहे. जूनमध्ये जेमतेम झालेल्या पावसाने जुलैच्या सुरुवातीलाच राज्यभरात सर्वदूर दमदार हजेरी लावली. मुंबई, ठाणे परिसरात मुसळधार पावसाने अनेक सखल भाग पाण्याखाली गेले तर काही ठिकाणी दुर्घटनांची नोंद झाली. कोल्हापूर, सांगली सातारा भागातील धरणाच्या पाणी साठ्यात समाधान कारक  वाढ झाली. राज्यातील अनेक नद्या दुधडी भरून वाहू लागल्या. धरणांतील पाणीसाठय़ात वाढ झाल्याने पाणीटंचाईचे मळभ दूर होऊ लागले आहे. मात्र मराठवाड्यातील मोठे आणि छोटे प्रकल्प अजूनही पावसाच्या कृपेसाठी प्रार्थना करत आहेत. त्यामुळे हवामान खात्याने वर्तविलेला हा अंदाज काहींना दिलासा देणारा तर काहींची धकधक वाढविणारा असा आहे.