शेतकरी आत्महत्यांचे दुष्टचक्र गतिमान होण्याची भीती

प्रतिनिधी, नागपूर, औरंगाबाद

Baramati farmer commits suicide by drinking poisonous medicine Allegation of neglect of government agencies
बारामतीत शेतकऱ्याची विषारी औषध पिऊन आत्महत्या, शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे आत्महत्या केल्याचा आरोप
Election campaigning was stopped due to rain
प्रचार पाण्यात! पावसाची रिपरिप प्रचाराच्या मुळावार, उमेदवार घरातच
chhattisgarh, bangaram devi, tribal tradition
आदिवासींमध्ये टाकून दिलं जातं नापास झालेल्या देवांना… आपण सत्ताधाऱ्यांची निदान उलटतपासणी तरी करायला काय हरकत आहे?
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…

बेभरवशाच्या मोसमी पावसाने पुन्हा  विदर्भ, मराठवाडय़ातील शेतकऱ्यांचे प्राण कंठाशी आणले आहेत. पावसाअभावी धगधगणाऱ्या दुष्काळ दाहाचे चटके आता अधिक तीव्र होत असून संभाव्य दुष्काळाच्या भीतीने अनेकांनी पेरण्याच केल्या नाहीत. तुरळक ठिकाणी उधार-उसनवारी करून पेरलेल्या पिकांनी चक्क माना टाकल्या आहेत.  जमिनीतली उरली-सुरली ओलही संपली आहे. एकूणच मराठवाडा आणि विदर्भात  दीड महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे. आठ दिवसात चांगला पाऊस न झाल्यास सलग दुसऱ्या वर्षी दुष्काळाला तोंड द्यावे लागणार असून शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मराठवाडय़ात जुलैच्या मध्यापर्यंत ४९ टक्के पाऊस पडणे अपेक्षित होते. त्यापैकी वार्षिक सरासरीच्या केवळ १६.०५ टक्के पाऊस  पडला आहे. पहिल्या पावसाच्या आधारावर ज्यांनी पेरण्या केल्या तेथे आता पिकांची अवस्था वाईट आहे.  येत्या आठ-दहा दिवसांत पाऊस नाही आला तर पिकांचे मरण अटळ आहे. गेल्या वर्षीदेखील अगदी असेच घडले होते. ओल संपल्याने मूळ तग धरू शकणार नाही, असे पैठण तालुक्यातील बालानगरचे माजी सरपंच अमोल गोर्डे सांगतात. अडुळ परिसरातील शेतकरीही हैराण आहेत. कारण त्यांच्याकडे फक्त एकच मोठा पाऊस झाला. संपूर्ण मराठवाडय़ात आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत केवळ ५३.५ टक्के पाऊस झाला. त्यामुळे एकूण लागवड क्षेत्र ४९.९६ लाख हेक्टर पैकी २४.३१ लाख हे. म्हणजे ४८.६६ टक्के पेरण्या झाल्या आहेत.

विदर्भात अमरावती विभागात १ ते १५ जुलैपर्यंत अपेक्षित १३७९ मि.मी. पैकी फक्त ९८० मि.मी. तर नागपूर विभागात अपेक्षित १५४० मि.मी.पैकी ८७२.२९ मि.मी. पाऊस झाला. बुलढाणा जिल्हा वगळता एकाही जिल्ह्य़ात सरासरीच्या निम्माही पाऊस नाही. पूर्व विदर्भात तर आणखी गंभीर स्थिती आहे. गोंदिया, भंडारा या धान उत्पादक जिल्ह्य़ात रोवणीचे प्रमाण केवळ पाच ते तीन टक्के आहे. पश्चिम विदर्भात पेरणीचे प्रमाण ७७  टक्के आहे. जुलै निम्मा संपला तरी शेत ओले करणारा पाऊस न झाल्याने पेरण्या करण्याची हिंमत होत नाही, असे नागपूर जिल्ह्य़ातील चांदणीबर्डीचे (ता. नरखेड) शेतकरी मंगेश काळे यांनी सांगितले.

दुष्काळ, नापिकीमुळे आत्महत्यांचे प्रमाण अधिक असलेल्या विदर्भातील सहा जिल्ह्य़ात मागील दहा वर्षांत ११ हजार २५१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. मराठवाडय़ात ही संख्या ४ हजार ५६५ आहेत. अशीच स्थिती राहिली तर सलग दुसऱ्या वर्षीचा हा दुष्काळ मरणकळा घेऊन येईल, अशी भीती व्यक्त होत आहे.

कर्ज वाटपही संथ

दुष्काळाचा असा तेरावा महिना सुरू असताना सरकारी मदतीचे घोडेही नेहमीप्रमाणे अडलेच आहे. सर्वसाधारणपणे खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी  शेतकऱ्यांच्या हाती कर्जाची रक्कम पडणे अपेक्षित असते. मात्र यंदा हंगाम सुरू होऊन महिना उलटला तरी कर्जासाठी पायपीट सुरूच आहे.  विदर्भात आतापर्यंत केवळ ३८.४९ टक्के, तर  मराठवाडय़ात २१.८० टक्के पीक कर्जाचे वाटप झाले.

भरपावसाळ्यात चाऱ्याचे दर गगनाला

लातूर : भर पावसाळय़ात उन्हाळय़ापेक्षाही चाऱ्याचे भाव गगनाला भिडले असून रब्बीच्या ज्वारीच्या कडब्याच्या पेंडीचा भाव ६५ रुपये, हायब्रीड ज्वारीचा ३५ रुपये पेंडी, तर हिरवा चारा ९० ते १०० रुपये पेंडीने बाजारपेठेत विकला जात आहे. जिल्हय़ात दुधाळ जनावरे असली तरी त्यांना पुरेसा चारा मिळत नसल्याने दुधाच्या उत्पादनात पावसाळय़ात वाढ होण्याऐवजी घट होते आहे. पाऊस पडलेला नसल्याने चारा छावणी जरी सुरू केली तरी छावणीत जनावरांना चारा व विशेषत: पिण्याचे पाणी कुठून उपलब्ध करणार, असा प्रश्न आहे.

लष्करी अळीमुळे मका पिकावर नांगर

येवला: नाशिक जिल्ह्य़ासह इतरत्रही या खरीप हंगामात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादूर्भाव झाल्याने शेतकरी धास्तावले असून येवला तालुक्यातील एका शेतकऱ्याने मका पिकावर  नांगरच फिरवला.मका पेरताच दोन पानांवर असलेल्या कोवळ्या रोपापासूनच प्रादुर्भाव दिसू लागताच मका उत्पादकांची झोपच उडाली. दोन-तीन वेळा औषध फवारणी करूनही अळी आटोक्यात येत नाही. यामुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी अधिकच आर्थिक अडचणीत येत आहे.