उष्म्याच्या कडाक्याने हैराण झालेल्या जिल्ह्यातील अनेक भागांस बुधवारी सायंकाळी जोरदार पावसाने झोडपून काढले. येवला तालुक्याचा अपवाद वगळता इतरत्र वाऱ्याचा वेग कमी असल्याने फारसे नुकसान न होता उलट उष्मा कमी होण्यास पावसामुळे मदतच झाली.  मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातील तापमान ४० अंशांपुढे कायम असल्याने नागरिकांना अक्षरश: भाजून निघाल्याचा अनुभव येत होता.mh02 बुधवारी सकाळपासूनच ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. दुपारनंतर मात्र परत उष्म्यात वाढ झाली. सायंकाळी पाचनंतर वातावरणात अचानक बदल झाला. पाचच्या सुमारास सटाणा शहरासह परिसरास मुसळधारेला सुरुवात झाली. पावसाचा वेग इतका होता की, क्षणात संपूर्ण शहरातून पाणी वाहू लागले. दीड ते दोन तास हा पाऊस सुरू होता. सोमवारीही सटाण्यास पावसाने झोडपले होते. येवला तालुक्याच्या पूर्व भागातही सुमारे तासभर पाऊस कोसळल्याने सायगाव, नगरसूल परिसरात शेतांमध्ये सर्वत्र पाणीच पाणी साचले. वादळी वाऱ्यांमुळे काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. निफाडला किरकोळ तर ओझर परिसरात जोरदार पाऊस झाला. याशिवाय देवळा, चांदवड, कळवण या तालुक्यांमध्येही कुठे अधिक तर कुठे कमी स्वरूपात पावसाने हजेरी लावली. या पावसाने पिकांचे फारसे नुकसान झाले नसले तरी वादळी वाऱ्यामुळे येवला तालुक्यात वृक्ष उन्मळण्याचे प्रकार घडले. येवल्यात बस स्थानकाजवळ एक वृक्ष कोसळून त्याखाली दबल्याने वाहनांचे नुकसान झाले. ग्रामीण भागात अजून आंब्याच्या झाडांना भरपूर कैऱ्या असल्याने वाऱ्यामुळे आंबा उत्पादकांना फटका बसला.