13 July 2020

News Flash

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी

कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात शनिवारी पावसाने दमदार हजेरी लावली. तर पूर्वेकडील हातकणंगले, शिरोळ या तालुक्यात मात्र हलक्या सरी कोसळल्या. पावसाचे आगमन बळीराजाला सुखावणारे आहे.

| July 13, 2014 02:40 am

कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात शनिवारी पावसाने दमदार हजेरी लावली. तर पूर्वेकडील हातकणंगले, शिरोळ या तालुक्यात मात्र हलक्या सरी कोसळल्या. पावसाचे आगमन बळीराजाला सुखावणारे आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी पिकांना जीवदान मिळणार असल्याने आनंदीत झाला आहे. कोरडे पडू लागलेल्या सर्वच धरणातील पाणी साठय़ामध्ये हळूहळू वाढ होत चालल्याने पाण्याच्या नियोजनाची चिंताही दूर होताना दिसत आहे.
संपूर्ण जून आणि जुलचा पहिला आठवडा पावसाअभावी गेला. पावसाने दर्शन न दिल्याने ऐन आषाढात पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी यांचा प्रश्न गंभीर होऊ लागला होता. शुक्रवार व शनिवार या दोन्ही दिवशी जिल्ह्याच्या पश्चिमेकडील घाट भागात दमदार पर्जन्यवृष्टी  झाल्याचे वृत्त आहे. राधानगरी, गगनबावडा, आंबा, चांदोली आदी भागात  झालेल्या जोरदार पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. पन्हाळा, शाहूवाडी, वारणा, गडिहग्लज या भागात दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. हातकणंले व शिरोळ या तालुक्यात रिमझिम पावसाने हजेरी लावली. कोल्हापूर शहरातही दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. शहरासह पूर्वेकडील भागात पावसाला म्हणावा असा जोर नसल्यामुळे येथील शेतकरी चिंतेत आहे.
जिल्ह्यालगत असलेल्या कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांतही मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता बळावली आहे. पश्चिम भागात पावसाचा जोर वाढल्यामुळे शेतकऱ्यांनी भात लावण करण्याची तयारी केली आहे. पावसाचा जोर असाच वाढला तर खरीप हंगामातील पिकांना या पावसामुळे जीवदान मिळणार आहे. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.                                                                कोयना धरणक्षेत्रात दमदार पाऊस
वार्ताहर, कराड
पावसाळय़ाचा सव्वामहिना कोरडा गेल्याने कोयनेसह ठिकठिकाणचे जलसिंचन प्रकल्प तळ गाठत असताना, दोन दिवसांपासून दमदार पावसास प्रारंभ झाला आहे. बेंदराचा मुहूर्त साधून जलधारा कोसळू लागल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण असून, खरीप हंगामाला दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. दिवसभरात कोयना पाणलोट क्षेत्रात ४७ मि. मी. पाऊस झाला असून, कोयना धरणात पाण्याची आवक होऊ लागली आहे. गेल्या ३६ तासांत कोयना पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर विभागात १५० तर, नवजा विभागात १९९ मि. मी पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, कृष्णा, कोयना नद्यांकाठीही पावसाची रिपरिप सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रात सर्वत्र कमी, अधिक प्रमाणात पाऊस कोसळत असल्याची आकडेवारी असून,  त्यात पाटण तालुक्यातील पाथरपुंज येथे ५२ एकूण १,२०७ मि. मी. इतका सर्वाधिक पाऊस झाला आहे. पाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा विभागात ७७ एकूण १,०२६ मि. मी. पाऊस नोंदला गेला आहे.
आज सायंकाळपर्यंतची आकडेवारी, कंसात गतवर्षीच्या नोंदी – कोयना धरणाचा  पाणीसाठा १३.२२ टीएमसी (७२.८६ ), उपयुक्त पाणीसाठा ८.१ (६७.७४), उपयुक्त पाणीसाठय़ाची टक्केवारी ७.६९ (६४.३६), कोयना पाणलोट क्षेत्रातील पाऊस कोयनानगर – ४७ एकूण ७३३ (२,१६७), नवजा ५५ एकूण ८५८ (२,५४२), महाबळेश्वर ३९ एकूण ४९० (२,२७५), सरासरी ६९३.६६ (२३२८) मि. मी पावसाची नोंद आहे. १ जूनपासून कोयना जलाशयात ३ टीएमसी पाण्याची घट झाली आहे. तर, गतवर्षी आजअखेर ४३ टीएमसी पाण्याची भर पडून कोयनेचा पाणीसाठा ७२.८६ टीएमसी म्हणजेच ६९.२२ टक्के नोंदला गेला होता.
आज दिवसभरात कोयना धरणाखालील कराड व पाटण तालुक्यात पावसाची रिपरिप राहिल्याने जनजीवन विस्कळीत होते. जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेला पाऊस असा- धोमबलकवडी १० एकूण १२४, जांभळी १७ एकूण २२९, प्रतापगड २९ एकूण ४५२, धोम प्रकल्प ३ एकूण २०६, माळेवाडी (फलटण) ३ एकूण ५९, तारळी ४ एकूण १९९, ठोसेघर १५ एकूण २८८, वळवण ३४ एकूण ७७५,नागठाणे १ एकूण ११२, उरमोडी प्रकल्प ३ एकूण ८९, सोनाट ३० एकूण ३३४, रांजणी ६ एकूण ८८, चाफळ ७ एकूण २०३, मेढा ५ एकूण ७८.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2014 2:40 am

Web Title: rain in kolhapur 2
टॅग Karad,Kolhapur,Koyna
Next Stories
1 १५ ऑगस्टच्या मुहूर्तावर मुंबई विमानसेवेला प्रारंभ
2 जुन्या-नव्या शिवसैनिकांनी एकत्र यावे – दिवाकर रावते
3 मनसे इच्छुकांच्या उद्या मुलाखती
Just Now!
X