पुणे : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ऐन थंडीच्या हंगामात ढगाळ वातावरण आणि पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. रविवारी मुंबई परिसरासह कोकण विभागांत तुरळक ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात काही भागांत हलक्या पावसाने हजेरी लावली. आणखी एक ते दोन दिवस राज्याच्या बहुतांश भागात ढगाळ हवामानाची स्थिती राहण्याची शक्यता आहे.

अरबी समुद्रातील स्थितीमुळे राज्यात अवतरलेली थंडी गायब होऊन गेल्या चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तीन दिवसांपासून मराठवाडावगळता इतर तुरळक भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊसही कोसळला आहे. ढगाळ वातावरणामुळे दिवसाच्या कमाल तापमानात घट झाली असली, तरी रात्रीचे किमान तापमान अद्यापही सरासरीच्या पुढेच आहे. त्यामुळे काही ठिकाणी रात्री हलका उकाडाही जाणवत आहे.

रविवारी मुंबईत हलक्या सरी पडल्या. रत्नागिरीतही पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर आणि नाशिक भागांतही पाऊस झाला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार १४ डिसेंबरला कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. १५ डिसेंबरपासून मात्र संपूर्ण राज्यात कोरडय़ा हवामानाची स्थिती राहणार आहे.

आजही पाऊस..

अरबी समुद्रातील घडामोडींमुळे  सोमवारी  मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यत हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. शनिवारी रात्री आणि रविवारी पहाटे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यत काही ठिकाणी ३७ मिमीपर्यत पावसाची नोंद झाली आहे.