कोयना धरण क्षेत्रासह कृष्णा, कोयना काठांवर तसेच पश्चिम महाराष्ट्रातील ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या, भारी सरी कोसळू लागल्या आहेत. तीन आठवडय़ांच्या सलग विश्रांतीनंतर कोसळू लागलेला हा पाऊस खरीप हंगामाला जीवदान देणार का, हे त्याच्या सातत्यावर अवलंबून राहणार आहे. परिणामी जोरदार पावसाच्या अपेक्षेने बळीराजा आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. आज दिवसभरात ढगाळ वातावरण राहताना, पावसाच्या सरी कोसळत असून, अचानक उन्हाचा तडाखाही वाढत आहे. परिणामी ऊनपावसाच्या या खेळामुळे पाऊस कायम राहील का, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
आज शनिवारी (दि. १८) सायंकाळी ५ वाजेपर्यंत गेल्या ३४ तासात कोयना पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर विभागात ५८ एकूण १३५८, महाबळेश्वर विभागात ४१ एकूण १४४५ तर, नवजा विभागात ४८ एकूण सर्वाधिक १४७९ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, पावसाचा रात्रीचा जोर आणि दिवसाची ओढ असे चित्र असून, गेल्या दीड दिवसातील पावसाने कोयनेसह सर्वच पाणीसाठय़ांचा टक्का वाढवला आहे. कोयना धरणात पाऊण टीएमसीची वाढ होताना, सध्या जलाशयाचा पाणीसाठा ५२.५५ टीएमसी म्हणजेच जवळपास ५० टक्के असून, पाणीपातळी २,१०९ फुटांवर राहिली आहे. कृष्णा, कोयना नद्याकाठांबरोबरच सर्वत्र पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यात दुष्काळी भागातही कमी अधिक प्रमाणात पाऊस झाल्याचे वृत्त आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा प्रकल्पाचा पाणीसाठा ११.४६ टीएमसी म्हणजेच ४५.१२ टक्के, राधानगरी ३.९७ टीएमसी म्हणजेच ४७.४५ टक्के, सांगली जिल्ह्यातील वारणा-चांदोली प्रकल्पाचा पाणीसाठा २४.८३ टीएमसी म्हणजेच सर्वाधिक ७२.१८ टक्के आहे. सातारा नजीकच्या धोम बलकवडी प्रकल्पाचा पाणीसाठा १.४० टीएमसी म्हणजेच सर्वात अल्प ३२.४० टक्के, धोम ५.२० टीएमसी म्हणजेच ३८ टक्के, तर कण्हेर प्रकल्पात ६.४९ टीएमसी म्हणजेच ६४ टक्के पाणीसाठा आहे. कोयना धरणक्षेत्रात पाथरपुंजला सर्वाधिक पाऊस झाला आहे. पाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा येथे १,५११ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.