News Flash

ठिकठिकाणी अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे चेहरे उजळले

गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी रात्री बरसलेल्या पावसाने जिल्हय़ात समाधान व्यक्त होत असून, नदी, नाले वाहते झाले आहेत. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. निलंगा तालुक्यातील कासार शिरसीजवळील बडूर

| August 31, 2014 01:40 am

गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी रात्री बरसलेल्या पावसाने जिल्हय़ात समाधान व्यक्त होत असून, नदी, नाले वाहते झाले आहेत. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. निलंगा तालुक्यातील कासार शिरसीजवळील बडूर लघुसिंचन तलाव ओसंडून वाहात आहे. त्यामुळे शनिवारी सकाळी काही तास वाहतुकीचा खोळंबा झाला.
रात्रभर पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. पावसाने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वच तालुक्यांत पावसाचे दमदार आगमन झाले. मेघगर्जनेसह, विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. चाकूर तालुक्यातील शेळगाव परिमंडलात तब्बल १७० मिमी, उदगीर तालुक्यातील हेर मंडळात १२६ मिमी, निलंगा तालुक्यातील कासार शिरसी मंडळात १७० मिमी, तर लातूर तालुक्यातील कासारखेडा मंडळात ६५ मिमी पाऊस झाला. निलंगा तालुक्यातील बडूर येथील लघुसिंचन प्रकल्प १०० टक्के भरून ओसंडून वाहू लागल्यामुळे रस्त्यावर पाणी साचले व काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला.
या वर्षी पहिल्यांदाच गावोगावचे ओढे वाहते करणारा दमदार पाऊस बरसला. दुष्काळाचे गडद सावट समोर असल्यामुळे शेतकरी हबकून गेले होते. मात्र, सर्वत्र बरसणाऱ्या सरींमुळे सध्या आनंदाचे वातावरण आहे. शनिवारी पहाटेपासूनच पावसाच्या सरींवर सरी बरसत होत्या. दिवसभर सूर्यदर्शन घडले नाही.
शनिवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्हय़ात सरासरी ४१.२४ मिमी पावसाची नोंद झाली. यंदाच्या मोसमातील पावसाची सरासरी ३२९.९१ मिमी झाली. आतापर्यंत अपेक्षित पावसाच्या ६३.२९ टक्के पाऊस झाला. वार्षिक सरासरीच्या हा पाऊस केवळ ३९.३० टक्के आहे. गेल्या २४ तासांत तालुकानिहाय झालेला पाऊस मिमीमध्ये, कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे : लातूर २८.८८ (३३६.४१), औसा २३.११ (२५८.४१), रेणापूर ३६.५० (३१७.५०), उदगीर ४९.५७ (३९७.२५), अहमदपूर २८.८३ (३२१.०२), चाकूर ७४ (३८६), जळकोट ३३.५० (२८८), निलंगा ४८.६३ (३२०.८७), देवणी ३८ (४१९), शिरूर अनंतपाळ ५१.३३ (३४४.४४).
पावसाच्या सरींमुळे  वातावरणात चतन्य
वार्ताहर, परभणी
गणपती बाप्पासोबत पावसाचेही जिल्हाभर जोरदार आगमन झाले. गेल्या ३ दिवसांपासून दमदार पाऊस कोसळत आहे. शनिवारीही दिवसभर पावसाच्या सरी सुरू होत्या. परभणी शहरासह जिल्ह्याच्या सर्वच भागात दिवसभर चांगला पाऊस झाला. सर्वदूर पावसाचा पिकांना फायदा होणार आहे. सकाळी आठपर्यंत ४.९० मिमी, तर सायंकाळपर्यंत ८ मिमी पावसाची नोंद झाली.
गेल्या अनेक दिवसांपासून हुलकावणी देणारा पाऊस चार दिवसांपासून हजेरी लावत आहे. पोळ्याच्या दिवशीच पावसाने हजेरी लावली. तेव्हापासून अधूनमधून पावसाच्या सरी येत आहेत. गणरायासह पावसानेही दमदार आगमन केले. शनिवारी पहाटेपासून पडणारा पाऊस दिवसभर सुरूच होता. दुपारी एकच्या दरम्यान झालेल्या जोरदार पावसाने पहिल्यांदाच शहरात सगळीकडे पाणी झाले.
या पावसामुळे सोयाबीन, कापसाला लाभ होणार आहे. खरीप हंगाम वाया गेल्यात जमा असला, तरी ज्या शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर जगवलेला कापूस व रिमझिम पावसातच पेरलेल्या सोयाबीनला या पावसाने जीवदान मिळाले. पावसामुळे चाराही उपलब्ध होईल आणि पिण्याच्या पाण्याचीही काही प्रमाणात सोय होईल. दोन दिवसांपासून जिल्हाभर ढगाळ वातावरण असून दिवसा अनेकदा अंधारून येत आहे. भाद्रपद महिन्यात श्रावणाचे वातावरण तयार झाले आहे.
पावसाच्या सरासरीने दोनशेचा आकडा आता कुठे ओलांडला असून, पावसाच्या तीन महिन्यानंतर २२५.६२ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वात कमी पाऊस पालम तालुक्यात (१६४ मिमी) झाला, तर सरासरीत जिंतूर तालुका (२६०.१३ मिमी) आघाडीवर आहे. परभणी २६०.२४, पूर्णा २०३, गंगाखेड २१५, सोनपेठ २५९, सेलू २१७, पाथरी २५९, मानवत २४५ मिमी. सततच्या पावसामुळे वातावरण पूर्ण बदलले आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच असलेली चिंता करण्याजोगी स्थिती या पावसाने पूर्ण पालटून टाकली. आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम असली, तरी सध्या पडत असलेल्या पावसाने ग्रामीण भागात वेगळेच चतन्य पाहायला मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2014 1:40 am

Web Title: rain in latur
टॅग : Latur,Parbhani
Next Stories
1 संघर्ष यात्रेपासून पाशा पटेल ‘दूर’!
2 रामगोपाल वर्माविरोधात औरंगाबादेत गुन्हा दाखल
3 पंकजा मुंडे यांच्या सभेत पदाधिकाऱ्यांचाच अडथळा!
Just Now!
X