पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची प्रगती सध्या योग्य पद्धतीने सुरू असून, विविध अडथळ्यांचा सामना करीत ते तब्बल दोन आठवडय़ांच्या विलंबानंतर कोकणमार्गे राज्यात दाखल होणार आहेत. पुढील दोन ते तीन दिवसांत मोसमी वारे दक्षिण कोकण व्यापणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले आहे. कोकणानंतर दक्षिण मध्य महाराष्ट्रातून मोसमी वाऱ्यांची पुढील वाटचाल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांत कोकण विभागासह दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘वायू’ चक्रीवादळाचा मोसमी वाऱ्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. अंदमानातील आगमनानंतर समुद्रातील स्थितीमुळे केरळमध्ये पोहोचण्यास मोसमी वाऱ्यांना एक आठवडय़ाचा विलंब झाला. ८ जूनला ते केरळमध्ये दाखल होऊन त्यांची पुढील वाटचाल वेगात सुरू असतानाच अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाले. या चक्रीवादळाने बहुतांश बाष्प खेचून नेल्याने मोसमी वाऱ्यांचे प्रवाह कमजोर झाले. ते पुन्हा निर्माण होण्यासाठी पुन्हा आठवडय़ाचा वेळ गेला आहे.

पाऊसभान..

कर्नाटक आणि तमिळनाडूनचा बहुतांश भाग व्यापून मोसमी वारे कोकणच्या दिशेने पुढे सरकत आहेत. मात्र, साधारण वेळेपेक्षा राज्यात पाऊस पोहोचण्यास यंदा दोन आठवडय़ांचा विलंब लागला आहे. सध्या चक्रीवादळ ओसरले असून, मोसमी वाऱ्यांचा उत्तरेकडील प्रवास जोरदारपणे सुरू झाला आहे.