विदर्भ आणि मराठवाड्यातील हवामान अस्थिर होणार असल्यामुळे २० आणि २१ फेब्रुवारी दरम्यान काही भागांमध्ये वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशीम जिल्ह्यांमधील अनेक भागांमध्ये या काळात मेघ-गर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच यवतमाळ, वर्धा, नागपूर, जालना, परभणी, हिंगोली आणि औरंगाबाद जिल्ह्यांतील काही भागांमध्ये देखील वादळी पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

वादळी पावसासोबत काही प्रमाणात गारपीट होण्याची देखील शक्यता आहे. या आठवड्यात संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यातील तापमानात वाढ होऊन २० ते २२ फेब्रुवारी दरम्यान काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहील, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे.

शेतकऱ्यांनी या हवामानाच्या परिस्थितीनुसार नियोजन करून शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल तर तो व्यवस्थितपणे झाकून ठेवावा. वादळी पावसाच्यादरम्यान सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. मोकळ्या मैदानात तसेच झाडाखाली अथवा पत्र्याच्या शेडमध्ये थांबणे टाळावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.