औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, बीड, परभणीसह मराठवाडय़ात ठिकठिकाणी शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी बेमोसमी पावसाने दमदार हजेरी लावली. उस्मानाबाद जिल्ह्य़ात वीज कोसळून महिला व लहान मुलीचा मृत्यू झाला, तर एक महिला जखमी झाली. जालना जिल्ह्य़ातही शुक्रवारी उशिरा दोनजणांचा वीज कोसळून मृत्यू झाला.
उस्मानाबाद जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी बेमोसमी पावसाने हजेरी लावली. कळंब तालुक्यातील बोरगाव (धनेश्वरी) येथे वीज कोसळून शेतात काम करणारी जिजाबाई तोरगडे (वय ५०) ही महिला ठार झाली. परंडा तालुक्यात पाऊस सुरू असताना राधा सचिन गिलबिले (वय ११) ठार झाली, तर तिची आई रेखा गिलबिले (वय ३२) गंभीर जखमी झाली. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी वादळासह पावसात पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक घरांवरील पत्रे उडाले. वाशी, भूम, तुळजापूर तालुक्यांत ठिकठिकाणी वादळी पाऊस झाला. शेतामध्ये काढून टाकलेल्या ज्वारीचा कडबा भिजला.
परभणीत घरांवरील पत्रे उडाले
शुक्रवारी सायंकाळी व रात्री परभणी जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. सेलू, जिंतूर भागात मुसळधार पाऊस झाला. अनेक गावांत घरावरील पत्रे उडून लाखोंचे नुकसान झाले. घरांवरील पत्रे उडाल्याने अनेकांचे संसार उघडय़ावर पडले. काही ठिकाणी पत्रे व दगडांच्या माऱ्याने लोकांना किरकोळ जखमा झाल्या. जवळा झुटा येथील सरपंच लक्ष्मण झुटे, बाबासाहेब झुटे, दत्ता झुटे, सोपान झुटे, कैलास झुटे, परमेश्वर होंडे, भिकाजी झुटे आदींच्या घरावरील पत्रे उडाले. या सर्वानी प्रशासनाकडे मदतीची मागणी केली. परभणी शहरातही काही वेळ पाऊस झाला. अनेक ठिकाणी विजेचा लपंडाव सुरू होता.
औरंगाबादेतही पाऊस
औरंगाबाद शहर व परिसरात शनिवारी दुपारी दोन वेळा बेमोसमी पाऊस पडला. गेले काही दिवस कडक उन्हामुळे वातावरणात असह्य़ उष्मा वाढला असून, उकाडय़ाने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाच्या सरींमुळे चांगलाच दिलासा मिळाला. विशेष म्हणजे पाऊस पडत असताना लख्ख ऊनही पडले होते. त्यामुळे एकाच वेळी ऊन व पावसाचा रंगलेला खेळ औरंगाबादकरांनी अनुभवला. पावसाच्या सरी पडून गेल्यानंतर वातावरणात आल्हाददायक गारवा निर्माण झाला होता.
जालना जिल्ह्य़ाच्या बहुतेक भागात शुक्रवारी रात्री व शनिवारी वादळी पाऊस झाला. वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला. अर्जुन नानासाहेब तांबे (वय १८, दुधपुरी, तालुका अंबड) व प्रकाश गोरख राऊत (वय २५, गवळी पोखरी, तालुका जालना) अशी या दोघांची नावे आहेत. जालना शहरात शनिवारी संध्याकाळी अर्धातास पाऊस झाला. बदनापूर तालुक्यात गारपिटीसह पावसाने हजेरी लावली. जालना, अंबड, घनसांगवी तालुक्यांतील काही भागातही चांगला पाऊस झाला.
बीड जिल्ह्य़ात शनिवारी संध्याकाळीही जोरदार पाऊस झाला. बीड तालुक्यातील बोरखेड, महाजनवाडी गावांना पावसाने झोडपले. बोरखेड येथे वीज कोसळून बैल दगावला, तर दुसरा जखमी झाला.