यंत्रणेची कसोटी, १३ लाख भाविक दाखल

कुंभमेळ्यात रविवारी होणाऱ्या दुसऱ्या शाही पर्वणीसाठी लाखो भाविक नाशिक व त्र्यंबकेश्वर नगरीत दाखल होत असताना पूर्वसंध्येला झालेल्या मुसळधार पावसामुळे जनसागराचे व्यवस्थापन करताना पोलीस यंत्रणेची कसोटी लागली आहे. श्रावणी अमावस्येच्या पाश्र्वभूमीवर, शनिवारी सकाळपासून लाखो भाविकांनी रामकुंड व कुशावर्त तीर्थावर स्नानाचा योग साधण्यास सुरूवात केली. भाविकांच्या गर्दीचा ओघ वाढत असतानाच दुपारी विजांच्या कडकडाटासह दीड तास पावसाने नाशिकला झोडपले. यामुळे शहरातील बहुतांश रस्ते पाण्याखाली गेले. गोदावरीच्या पातळीत अचानक वाढ झाल्यामुळे अर्धा तास रामकुंडावर स्नानास प्रतिबंध करण्यात आला. दरम्यान, काळात गंगापूर धरणातील विसर्ग थांबविण्यात आला. धुळे जळगाव जिल्ह्यालाही पावसाने झोडपले. जळगावच्या एरंडोल येथे वीज पडून एकाचा मृत्यू झाला.
जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुंभमेळ्यातील दुसऱ्या शाही पर्वणीसाठी देशभरातील भाविकांचा ओघ कुंभ नगरीकडे सुरू आहे. आदल्या दिवशी रेल्वे, रस्ता मार्गे जवळपास १० लाख भाविक नाशिकमध्ये, तर तीन लाख भाविक त्र्यंबकमध्ये दाखल झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
दरम्यान, शनिवारी दुपारी जवळपास दोन तास झालेल्या पावसाने शहरातील बहुतांश रस्ते व मुख्य चौक पाण्याखाली गेले. अनेक रस्त्यांवरून पाण्याचे लोट वाहत असल्याने काही मार्गावरील एका बाजूची वाहतूक बंद करावी लागली. बहुतांश भागातील वीज पुरवठा खंडित झाला. गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे रामकुंड व परिसरातील घाटांवरील स्नान अर्धा तास थांबविण्यात आल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन गोरे यांनी सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून पर्वणीसाठी गंगापूर धरणातून सोडलेले पाणी थांबविण्यात आले. नदी काठावरील टाळकुटेश्वर परिसरातील रस्ता वाहून गेला. साधुग्राममध्ये पाणी शिरल्याने साधू-महंतांची तारांबळ उडाली.
पुण्यात वादळी पाऊस!
पुणे : पुणे शहरात शनिवारी दुपारी सलग चौथ्या दिवशी जोरदार वादळी पावसाने हजेरी लावली. सुमारे दीड तासांत पुणे वेधशाळेत या पावसाची नोंद तब्बल ४९ मिलिमीटर इतकी झाली. हवामानाच्या अंदाजानुसार, पुण्यात आणखी दोन दिवस वादळी पावसाच्या सरी अपेक्षित आहेत. शहरात कोसळणारा पाऊस धरणक्षेत्रात मात्र कोसळलाच नाही.