News Flash

सांगली जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ

सांगली जिल्ह्यात गेले ४८ तासांहून अधिक काळ मघा नक्षत्राने धुमाकूळ घातला असून अवघा जिल्हा ओलाचिंब झाला आहे. दुष्काळी आटपाडी, जत तालुक्यात दमदार संततधार सुरू असून

| August 29, 2014 02:15 am

सांगली जिल्ह्यात गेले ४८ तासांहून अधिक काळ मघा नक्षत्राने धुमाकूळ घातला असून अवघा जिल्हा ओलाचिंब झाला आहे. दुष्काळी आटपाडी, जत तालुक्यात दमदार संततधार सुरू असून पाणथळ जमिनीला नीर लागले असल्याने ओढय़ा-नाल्यांना पूर आले आहेत. गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जत तालुक्यामध्ये अतिवृष्टीची नोंद करीत पावसाने गतवर्षीच्या अडीच पटीहून अधिक हजेरी लावली.
जिल्ह्याच्या सर्वच भागात मघा नक्षत्राने दमदार हजेरी लावली असून गेले ४८ तासांहून अधिक काळ पावसाची उघडझाप सुरू आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागातील शिराळ्यापासून पूर्वेकडील जत तालुक्यातील उमदीपर्यंत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. बुधवारी दुपारी काही काळासाठी विश्रांती घेणाऱ्या पावसाने सायंकाळनंतर पुन्हा हजेरी लावली. रात्रभर पावसाची रिपरिप सुरूच राहिली. सरी मागून सरी पडत असल्याने लहान सर आली तर तत्काळ पाणी वाहत आहे. रात्रभर भीज पावसाने दमदार हजेरी लावल्याने पाणथळ रानातून पाणी ओढय़ा-नाल्यांना आले असून ग्रामीण भागातील ओढे दुथडी भरून वाहू लागले आहेत. हलक्या रानाला नीर लागले आहेत. डोंगराला पाझर फुटले असून ओघळ, नाले भरून वाहू लागले आहेत.
सांगली पाटबंधारे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरूवारी सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत सर्वाधिक पावसाची नोंद जत तालुक्यात झाली. या ठिकाणी ६५.४ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. गत वर्षी या कालावधीत जत तालुक्यात १७६ मिलीमीटर पावसाची नोंद असताना यंदा आजअखेर विक्रमी म्हणजे ४६३ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे.
अन्य तालुक्यात गतवर्षीचा पाऊस आणि आजअखेर झालेला पाऊस पुढीलप्रमाणे – इस्लामपूर ३७४, यंदाचा ४८१, पलुस १५१, १७८.७ तासगाव २१०, ३३३.४ सांगली २३४, ३७६.४ शिराळा ७७६, ८८९ मिरज ३५६, ६०७.७ विटा २९०, ५९२.३ आटपाडी १६२, ३१३.२ कवठेमहांकाळ १७६, ३७७ जत १७६, ३७७ आणि कडेगाव गतवर्षी झालेला ३०४ मिलीमीटर तर यंदा याच कालावधीत ३५१ मिमी पावसाची नोंद झाली असल्याचे पाटबंधारे विभागाने कळविले आहे.
पावसामुळे शेतात पाणी साचल्याने शेतीची कामे बंद असून शहरी भागातील विस्तारित उपनगरात सगळेच रस्ते चिखलमय झाले आहेत. महापालिका क्षेत्रातील गुंठेवारी भागात राहणाऱ्या लोकांची तर पावसाने त्रेधा उडाली आहे. रस्त्याच्या दुर्दशेमुळे संपर्क साधण्यात आणि आवक जावक करण्यात प्रचंड अडचणी निर्माण झाल्या आहेत.
५० घरांत पाणी  
सांगली शहरातील चतन्य नगरात सुमारे ५० घरांत पावसाचे पाणी शिरले असल्याने रहिवाशांची प्रचंड गरसोय होत आहे. महापौर श्रीमती कांचन कांबळे यांनी काल या भागाला भेट देऊन पाहणी केली. अधिकाऱ्यांना तत्काळ मदत करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत.
चांदोली धरण ९९ टक्के भरले    
शिराळा तालुक्यात असणारे चांदोली धरण तुडुंब भरण्याच्या मार्गावर असून सध्या या धरणातील पाणी साठा ९९ टक्के झाला आहे. ४३.२ टीएमसी क्षमता असणाऱ्या या धरणात गुरुवारी सकाळी ३४.०६ टीएमसी पाणीसाठा झाला असल्याचे सांगली पाटबंधारे विभागातून सांगण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्य़ात पावसाचे दमदार पुनरागमन
कोल्हापूर जिल्ह्य़ात पावसाचे दमदार पुनरागमन झाले आहे. पावसाच्या संततधारेमुळे जिल्ह्यातील धरणांत नव्वद टक्कय़ांपेक्षा अधिक जलसाठा झाला आहे.
गेल्या दोन दिवसांत सुरू असलेल्या पावसाने कासारी, जंगमहट्टी, घटप्रभा, कोदे ल.पा. ही चार धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून चिकोत्रा आणि जांबरे धरणांचा अपवाद वगळता सर्वच धरणांमध्ये ९० टक्कय़ांपेक्षा अधिक जलसाठा झाला आहे. यामध्ये राधानगरी धरण ९९ टक्के, तुळशी ९७ टक्के, वारणा ९९ टक्के, दुधगंगा ९५ टक्के, कडवी ९९ टक्के, कुंभी ९८ टक्के तर पाटगाव धरण ९६ टक्के, चित्री ९८ टक्के शिवाय चिकोत्रा ६०, तर जांबरे धरण ३७ टक्के भरले आहे.
जिल्ह्यात १ जूनपासून आजअखेर गगनबावडा तालुक्यात कमाल ३ हजार ८१८ मि.मी. व त्यानंतर शाहूवाडी तालुक्यामध्ये १९१९.६२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर शिरोळ तालुक्यात किमान ३२४.३१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आजअखेर एकूण १४९०२.५१ मि.मी. पाऊस  झाला. आजअखेर सरासरी १२४१.८७ मि.मी. पाऊस झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2014 2:15 am

Web Title: rain in sangli 3
टॅग : Kolhapur,Sangli
Next Stories
1 विधानसभेसाठी १५ पेक्षा कमी जागा घेणार नाही-खा. आठवले
2 ‘स्वाभिमानी’स बारा जागा मिळाव्यात – गडय़ान्नावार
3 जन-धन योजनेंतर्गत १५ हजार खाती सुरू
Just Now!
X