कारभारणीची एकीकडे कर्करोगाशी झुंज, एकीकडे पदवीधर असलेल्या मुलीच्या लग्नाची रात्रंदिवस मनाला जाळणारी चिंता, अशातच अवकाळीसोबत गारपटीने सगळी गणितेच उद्ध्वस्त केली आहेत. गारपिटीमुळे उद्या-परवा विकल्या जाणाऱ्या द्राक्षांची धुळधाण झाली. २२० रुपये पेटीचा दलालांनी देऊ केलेला दर आता मणी तडकल्याने कुजू लागलेल्या द्राक्षांना ७०-८० रुपयेही कोणी द्यायला तयार नाही. समोरचा घाव चुकविता येतो, मागील घावाची चाहूल लागते, मात्र डोक्यावरून पडलेला घाव कसा चुकवायचा, असा सवाल तासगाव तालुक्यातील येळावीच्या भुजंगराव रामचंद्र पाटील या वयस्कर शेतकऱ्याचा आहे.
    मार्च महिन्यात तीन वेळा झालेल्या अवकाळीने आणि दोन वेळा झालेल्या गारपिटीने भुजंगराव पाटील या ६० वर्षांच्या वयस्कर शेतकऱ्याचे दु:ख आभाळातही मावणार असे आहे. गावच्या सोसायटीने हातभार दिला. ५  किलोमीटर अंतरावर असणाऱ्या भिलवडीपासून कृष्णा नदीतून पाणी आणून दोन एकर सोनाका जातीची द्राक्ष बाग फुलवली. गेली तीन वर्ष बागेचे उत्पन्न हे भांडवलाचा हप्ता आणि व्याज भागविण्यात गेले. यंदा काही तरी हाताला लागेल असे वाटत असतानाच निसर्गाने समोर आणलेल्या संकटात चांगुलपणावरचा विश्वासच डळमळीत झाला.
    मार्च महिन्यात द्राक्षाला मागणी होती. ४ किलोच्या एका पेटीला २२० रुपये दर द्राक्ष व्यापाऱ्यांनी देऊ केला होता. मात्र अद्याप गोडी यावयाची आहे. गोडी आल्याशिवाय मालाला वजन येणार नाही म्हणून चालढकल केली आणि हातातोंडाशी आलेला मात्र गारपिटीच्या तडाख्यात सापडला. गारांच्या मारामुळे मणी तडकले आहेत. मण्यातील साखरयुक्त पाणी घडात कोंडल्यामुळे घड कुजू लागले असल्याने त्याला ग्राहकच खरेदी करण्यास राजी होणार नाही. त्यामुळे व्यापारी आता हाच माल ७०-८० रुपयांनी तर घेतात की नाही अशी शंका आहे.
    दोन एकर बागेत सुमारे १० हजार पेटी माल निघाला असता, गारपीट झाली नसती तर मिळणारा दर आणि येणारे उत्पन्न यामध्ये सध्या दहा लाखाचे नुकसान झाले आाणि आता पुढील सालची जुळणी कशी करायची याचीच चिंता लागली आहे.
    निसर्गाच्या अवकृपेने एकीकडे घात केला असतानाच घरातील कारभारीन अंथरुणाला खिळलेली. पत्नी रंजना हिचा कर्करोगाशी लढा चालू आहे. मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार केले. आता मिरजेच्या गांधी कर्करोग रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयाच्या खर्चाचे कसे हा प्रश्न सतावत असतानाच मुलगी बी. ए. बी. एड. होऊनही नोकरीच्या बाजारात बेकारच ठरली. तिचे लग्न करण्याची चिंता मनाला पोखरत आहे. अशा अवस्थेत मायबाप सरकारची मदत म्हणजे आभाळच फाटलेले असताना ठिगळ कुठे आणि कसे लावणार, असा सवाल भुजंगराव करतात आणि डोळ्यातील आसवांना वाट मोकळी करतात. अशावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रवक्ते महेश खराडे यांचा आश्वासक हात पाठीवरून फिरला तरी त्यांचे सांत्वन कोणत्या शब्दात होणार असा प्रश्न व्यवस्थेलाच पडला आहे.