मध्यरात्री १२ वाजल्यापासून सुरू झालेल्या जोरदार पावसाने अवघ्या सांगली जिल्ह्याला झोडपले असून ओढय़ा-नाल्यांना पूर आल्याने अनेक भागांतील रस्ते वाहतूक शनिवारी सकाळी १० वाजेपर्यंत ठप्प झाली होती. सांगली, मिरज शहरात मान्सूनपूर्व पावसाने रात्रभर िधगाणा घालीत हाहाकार माजविला. एकाच पावसात सरासरीच्या २५ टक्के पल्ला गाठीत अतिवृष्टीच्या दुप्पट पाऊस मिरजेत झाला. मिरजेत १३० तर सांगलीत १२० मिलिमीटर पावसाची नोंद अवघ्या पाच तासात झाली.
    शुक्रवारी रात्री १० वाजल्यानंतर पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्याबरोबरच विजेचा गडगडाटही बराच काळ सुरू होता. मध्यरात्री १२ वाजल्यानंतर दमदार पावसाला सुरुवात झाली. पहाटे ५ वाजेपर्यंत एकसारखा पाऊस कोसळत होता. जिल्ह्याच्या पूर्वेकडील उमदी, जत पासून पश्चिम भागातील शिराळा तालुक्यापर्यंत मान्सून पूर्व पावसाने धुमाकूळ घातला. रात्रीचा पाऊस असल्याने या पावसाचा लोकांना अंदाज आला नाही. मात्र रानातील ताली, बांध भरून ओढापात्रात पाणी शिरल्यानंतरच अमाप पाऊस झाल्याचे चित्र समोर आले. गेल्या वीस वर्षांत अवघ्या ५ तासांत इतक्या मोठय़ा प्रमाणात पाऊस पडण्याची पहिलीच वेळ आहे.
    वादळी वारे, विजेचा गडगडाट रात्रभर सुरू होता. पावसाचा जोर ओसरला तरीही पहाटे ५ वाजेपर्यंत विजेचा गडगडाट सुरूच होता. जत, कवठेमहांकाळ, नागज, ढालगांव, आटपाडी, दिघंची, खरसुंडी, विटा, भाळवणी, कडेगाव, खानापूर, पलूस, वाळवा, इस्लामपूर, शिराळा, चिखली आदी ठिकाणी २२ मिलिमीटरपासून ३५ मिलिमीटपर्यंत पावसाची नोंद झाली आहे.
    जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद मिरजेत झाली असून या ठिकाणी ५ इंचाहून अधिक म्हणजे १३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर सांगली येथे याच कालावधीत १२० मिलिमीटर पाऊस पडला. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ४८० मिलिमीटर असताना मान्सून पूर्व पावसाने अवघ्या पाच तासात सरासरीच्या २५ टक्के हजेरी लावली आहे.  
वादळी वाऱ्याने रस्त्यावर झाडे पडल्यामुळे सांगली-आटपाडी मार्ग सकाळी १० वाजेपर्यंत बंद होता. तर ओढय़ांना पूर आल्यामुळे मिरज-सलगरे मार्गावरील वाहतूक सकाळपर्यंत ठप्प होती. सांगली, मिरज शहरात रात्रभर पाऊस झाल्याने विस्तारीत भागातील रस्त्यावर खुदाईमुळे मोठय़ा प्रमाणात चिखल निर्माण झाला आहे. ड्रेनेज योजना व पाणी पुरवठय़ासाठी रस्त्यावरच चरी काढल्याने अनेक वाहने अडकून पडली होती. पावसामुळे गुंठेवारी क्षेत्रातील नागरिकांची दैना उडाली आहे. सांगलीतील कर्नाळ रोड लगत असणाऱ्या उपनगरात काळ्या मातीमुळे सर्वात जास्त दैना उडाली आहे. मिरज शहरात मीरासाहेब उरुसानिमित्त पोलीस स्टेशन ते स्टेशन चौकापर्यंत उभारण्यात आलेल्या स्टॉलधारकांची तारांबळ उडाली.                               कोल्हापुरात चोवीस तासात ९.९८ मि.मि. पाऊस
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 9.९८ इतका पाऊस झाला असून आज अखेर सरासरी 32.44 मि.मि. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. तालुक्याच्या नावापुढे गेल्या चोवीस तासात झालेला पाऊस मि.मी. मध्ये दर्शविण्यात आला आहे. कंसात १ जून २०१४ पासून झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी दिली आहे.
करवीर १०.८९ ( २०.०८), कागल २.६५ (२३.२९), पन्हाळा २१.४२ (३९.२६), शाहुवाडी २०.५० ( ५०.१६), हातकणंगले २५.७५ (४४ ), शिरोळ २५.२८ (३८.५६), राधानगरी ६.०० (२०.१६), गगनबावडा ६.०० (२०.००), भुदरगड ० (५१.०४), गडिहग्लज ० (२५.५६ ), आजरा ० (४०.७५), चंदगड १.३३ (१६.४९).
जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात एकूण ११९.८२ मि.मि. पाऊस झाला असून १ जून २०१४ पासून एकूण ३८९.३५ मि.मी.  पावसाची नोंद झाली आहे.