दिवसभराच्या प्रचंड उकाडय़ानंतर सायंकाळी सांगली-मिरजेत उन्हाळी पावसाने हजेरी लावली. पावसाच्या सरी हलक्या असल्या तरी असह्य उकाडय़ाने हैराण झालेल्या नागरिकांना अल्पसा दिलासा मिळाला.
    जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड उकाडा जाणवत असून पारा ३९.२ सेल्सियसवर पोहोचला आहे. सकाळी ९ वाजल्यापासूनच तीव्र उन्हाचा चटका बसत आहे. दुपारी या उन्हाची तीव्रता वाढत असून यामुळे बाजारपेठेत सामसूम जाणवू लागली आहे.
    उन्हाची तीव्रता वाढत असतानाच आकाशात ढगांची गर्दी होत असल्याने हवेतील आद्र्रता वाढत आहे. यामुळे उकाडा जास्तच असह्य बनला आहे. गुरुवारी सायंकाळनंतर सांगली, मिरजसह कुंडल, पलूस परिसरात उन्हाळी पावसाने हजेरी लावली. पावसाचा जोर नसला तरी उकाडय़ामुळे हैराण झालेल्यांना हवेत गारवा निर्माण झाल्याने दिलासा मिळाला. मात्र आजच्या हलक्या पावसाने पुन्हा उद्यापासून उकाडय़ाचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत.