कोकण, कराड, नाशिक व नागपूरमध्ये शनिवारी चांगला पाऊस पडल्याचे वृत्त असून त्यामुळे अनेक ठिकाणी तापमानात घट झाल्याने उकाडय़ापासून लोकांची सुटका झाली.
सावंतवाडी : मृगाच्या पूर्वसंध्येला पावसाचा शिडकाव झाला. आभाळात पावसाचे ढग दाटून आले होते. मृगाच्या पूर्वसंध्येला कोसळलेला पाऊस जिल्ह्य़ात सर्वत्र कोसळला नाही. सावंतवाडी, आंबोली तसेच जिल्ह्य़ातील काही भागात संध्याकाळी पाऊस कोसळला. या हंगामात मान्सूनपूर्व वळवाचा पाऊस कोसळल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आहे.
दुष्काळी पट्टय़ाला पावसाने झोडपले
कराड : अवकाळी पावसाने दुष्काळी माण, खटाव, फलटण, खंडाळा तालुक्यासह सातारा जिल्ह्याच्या सर्वच विभागात हजेरी लावली. त्यात माण तालुक्यात सर्वाधिक ३०.४ मि. मी. पावसाची नोंद झाली असून, या पावसाने दुष्काळी पट्टय़ाला झोडपून काढीत पाण्यासाठी वणवण करणाऱ्या जनतेला दिलासा दिला.
वीज पडून दोघांचा मृत्यू
नाशिक : जिल्ह्य़ातील काही भागात शनिवारी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. येवला तालुक्यात वीज कोसळून दोन जण मरण पावले तर इगतपुरी तालुक्यात दोन मुली जखमी झाल्या. शनिवारी दुपारी इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, येवल्यातील काही भाग, नाशिक शहर व परिसर आदी ठिकाणी त्याने हजेरी लावली. येवला तालुक्यातील महालखेडा येथे शेतातील झोपडीवर वीज कोसळून गौरी वाघमारे (३५) आणि टिटव वाल्हेकर (४०) हे शेतमजूर ठार झाले.
नागपुरात सरी
नागपूर: नागपुरातही ढगांच्या गडगडाटासह रोहिणी नक्षत्रात आणि मृगाच्या एक दिवस आधीच जोरदार हजेरी लावली. शनिवारी पाऊण तास कोसळलेला पाऊस मात्र अनपेक्षितच होता. त्यामुळे रात्री कामाहून घरी परतणाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली. रस्त्यांवरून पाण्याचे लोटच्या लोट वाहत होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 7, 2015 5:59 am