वातावरणातील बदलामुळे गेले दोन दिवस अवकाळी पावसाची बरसात सुरू असून, आज शनिवारी दुपारनंतर धोधो पावसाने कराड परिसराची दैना उडवली. संततधार पाऊस व एकंदरच हवामान पावसाळय़ाची खरीखुरी अनुभूती देत होता. केवळ रब्बीच्या पेरणीला पोषक ठरलेला हा पाऊस सर्वागाने हानिकारक असल्याने रोगराई बळावणारा आहे. तर, काढणी होत असलेल्या खरिपालाही मोठा फटका बसला असल्याने या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे.
ऐन हिवाळय़ातील या पावसाने शहर परिसरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले असून, सखल भागातील दुकानगाळय़ात पाणी शिरले आहे. महामार्गासह ठिकठिकाणची वाहतूकही संथगतीने सुरू आहे. खरीप पिकांची काढणी आणि रब्बीच्या पेरणीला सुरुवात होत असतानाच कोसळलेल्या या पावसाने शेतीची कामे ठप्प आहेत. मोहर धरू पाहत असलेली आंब्याची झाडे धुवून निघाल्याने त्यासोबत कोवळा मोहर गळून गेला आहे. द्राक्षे व स्ट्रॉबेरीही धोक्यात आली आहे. काढणीला आलेला भात पावसाच्या तडाख्याने झोपला असून, काही ठिकाणीतर तो चिखल मातीत मिसळून मोठे नुकसान झाले आहे. जोमदार कोसळलेल्या पावसाने ऊस तोड व ऊसाची वाहतूक रेंगाळली आहे. गुऱ्हाळघरे तूर्तास विसावली आहेत. ढगाळ वातावरण व धोधो पावसाने सर्दी, पडसे, अंगदुखी व ज्वर अशा आजारांच्या रुग्णांची दवाखान्यात गर्दी वाढू लागली आहे. हा पाऊस कराड व पाटण तालुक्यात ठिकठिकाणी कमी-अधिक प्रमाणात कोसळल्याचे वृत्त असून, पाणीसाठवण प्रकल्पात व नद्यांच्या पाणीपातळीत काहीशी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 
सोलापुरात अवकाळी पावसाची हजेरी सुरूच; द्राक्ष बागा धोक्यात
प्रतिनिधी, सोलापूर
सोलापूर जिल्ह्य़ात अवकाळी पावसाची हजेरी सतत सुरूच असून चौथ्या दिवशी करमाळा, माळशिरससह मंगळवेढा, बार्शी आदी भागात पाऊस झाला. सतत पडत असलेल्या या पावसामुळे ज्वारी उत्पादक शेतक ऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असले तरी द्राक्ष व डाळिंब उत्पादकांचे धाबे दणाणले आहे. द्राक्ष व डाळिंब बागा धोक्यात आल्याचे सांगितले जात आहे.
करमाळा येथे १७.३८ मिली मीटर पाऊस पडला, तर माळशिरस येथे १३.४५ मिमी इतका पाऊस झाला. बार्शीत ४.०६ मिमी तर मंगळवेढय़ात ३.६६ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. याशिवाय माढा-२.२४, उत्तर सोलापूर-१.८२, पंढरपूर-१.४२ याप्रमाणे कमी-अधिक पावसाची नोंद झाली आहे. तसेच अक्कलकोट, सांगोला येथेही पावसाचा शिडकावा झाला. गेल्या महिनाभरात जिल्ह्य़ात अधुनमधून अवकाळी पावसाची हजेरी लागत आहे. शनिवारी सायंकाळी शहरात आकाशात ढगांनी गर्दी करून पावसाची चाहूल दिली होती.