27 May 2020

News Flash

तुळजापूरमध्ये गारपिटीने शेतकरी पुन्हा उद्ध्वस्त

कोकण वगळता राज्यात पुन्हा गारपीट होण्याबाबत हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज खरा ठरला. तुळजापूर तालुक्यातील हंगरगा (नळ), नंदगाव, बोरगाव, सलगरा (म.), लोहगाव व गुजनूर या गावांना

| March 10, 2015 01:30 am

कोकण वगळता राज्यात पुन्हा गारपीट होण्याबाबत हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज खरा ठरला. तुळजापूर तालुक्यातील हंगरगा (नळ), नंदगाव, बोरगाव, सलगरा (म.), लोहगाव व गुजनूर या गावांना रविवारी रात्री गारपिटीने अक्षरश: झोडपून काढले. यामुळे द्राक्ष बागांसह ज्वारी, हरभरा, गहू या पिकांबरोबरच आंब्याचेही मोठे नुकसान झाले.
८ मार्च रोजी तुळजापूर तालुक्यातील हंगरगा, नंदगाव, बोरगाव, लोहगाव, सलगरा व गुजनूर या गावांना रात्री वादळी वारे व प्रचंड विजांच्या कडकडाटासह झालेल्या गारपिटीने अक्षरश: झोडपून काढले. या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या ज्वारी, गहू व हरभरा या पिकांचे मोठे नुकसान झाले. गारपिटीचा सर्वात जास्त फटका द्राक्ष, पपई व डािळब या फळबागांना बसला. गारपीट व वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष बागा अक्षरश: भुईसपाट झाल्या. आंबा पिकाचेही मोठे नुकसान झाले. आंबा, तसेच चिंचेच्या झाडाला पालाच शिल्लक राहिला नाही. याबरोबरच गारपीट व वादळी वाऱ्यामुळे अनेक मोठी झाडे उन्मळून पडली.
विशेष म्हणजे गेल्या वर्षी ज्या भागाला गारपिटीने झोडपून काढले, त्याच गावांना याही वेळी गारपिटीने झोडपून काढले. मोठय़ा गारा, वादळी वारे व विजांचा कडकडाट यामुळे या भागातील नागरिक भयभीत झाले होते. हंगरगा येथील जिलानी कुरेशी यांच्या द्राक्ष बागेसह अनेक शेतकऱ्यांचे गारपिटीमुळे प्रचंड नुकसान झाले. प्रशासनाने तत्काळ या गावाची पाहणी व नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आíथक मदत देणे गरजेचे ठरले आहे.
गारपिटीचा सर्वात जास्त फटका हंगरगा, नंदगाव, लोहगाव, सलगरा (मड्डी) या गावांना बसला. सतीश कोरे, मधुकर पोतदार, प्रकाश मधुळे, अरुण कुलकर्णी यांचे ज्वारी व गव्हाचे नुकसान झाले, तर नंदगाव येथील द्राक्ष बागायतदार सिद्धप्पा मोसलगे, नीलकंठ बशेट्टी यांच्या बागायती पिकांचे नुकसान झाले. काही वेळ झालेल्या गारपिटीने क्षणात होत्याचे नव्हते करून टाकले. गारपिटीमुळे शेतकरी पुन्हा एकदा कोलमडून पडला आहे.
उदगीर, निलंगा, देवणीत पुन्हा अवकाळीमुळे त्रेधा
वार्ताहर, लातूर
निलंगा, उदगीर, देवणी व औसा तालुक्यांतील काही गावांत रविवारी रात्री पुन्हा अवकाळी पाऊस बरसल्यामुळे शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली.
हवामान खात्याने ८ ते १० मार्च दरम्यान अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. या अंदाजामुळे शेतकरी जागरूक होते. काहींनी हरभरा, गव्हाच्या राशी लांबवल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान काहीअंशी टळले. मात्र, वारा व पावसामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले. देवणी तालुक्यात सुमारे दीड तास जोरदार पाऊस बरसला. वलांडी, शिरूर अनंतपाळ येथेही पावसाने हजेरी लावली. उदगीर परिसरातही पावसाने तारांबळ उडवली. निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी, शेळगी, माळेगाव कल्याणी, तगरखेडा, निटूर, हाडगा, उमरगा, हलगरा, सावरी आदी गावांतही जोराचा पाऊस झाला. अवकाळी पावसासह जोराच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी आंब्याचा मोहोर पुन्हा गळून पडला. काही ठिकाणी कैऱ्यांचा सडा पडला. जिल्हाभरात आंब्याचे उत्पादन मोठे असते. परंतु गेल्या ३ वर्षांपासून आंब्याला मोहोर लागल्यानंतर येणाऱ्या वादळी पावसामुळे आंबा उत्पादनावर मोठा परिणाम होत आहे. सोमवारी दिवसभर हवामान कोरडे होते. दुपारी कडक ऊन होते. मात्र, शेतकऱ्यांनी अवकाळी पावसाचा चांगलाच धसका घेतला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2015 1:30 am

Web Title: rain in tuljapur
टॅग Cold,Latur,Osmanabad
Next Stories
1 गरीब मुलींच्या शिक्षणासाठी अधिकारी उभाणार एक कोटी
2 मराठवाडय़ातील १८ कारखान्यांकडे ऊस खरेदीकराचे ११४ कोटी बाकी
3 ‘हल्लेखोर, सूत्रधारांना शिक्षा मिळेपर्यंत डाव्यांचा लढा’
Just Now!
X