सोलापूर शहर व जिल्हय़ातील बहुतांश भागात यंदा प्रथमच मृग नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरीवर्गात समाधान व्यक्त होत आहे. मृग नक्षत्र कोरडा जाणार की काय, अशी भीती व्यक्त होत असताना अखेरच्या पर्वात गुरुवारी दुपारी अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.
यंदाच्या उन्हाळय़ात गारपिटीसह अवकाळी पाऊस मोठय़ा प्रमाणात झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर मृग नक्षत्रास प्रारंभ झाला तेव्हा मात्र वरुणराजाने दडी मारली होती. त्यामुळे जिल्हय़ात सुमारे दोन लाख हेक्टर क्षेत्रात खरीप पिकांची पेरणी करण्याच्या तयारीत असलेल्या शेतकरीवर्गात अस्वस्थता निर्माण झाली आहे. अखेर गुरुवारी दुपारी पावसाला प्रारंभ झाला. जिल्हय़ात अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, माढा, करमाळा, बार्शी आदी भागांत पावसाने हजेरी लावल्याने शेतक-यांना दिलासा मिळाला आहे.
रब्बी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्हय़ात गतवर्षी मृग नक्षत्रासह इतर नक्षत्रांनी चांगली साथ दिल्यामुळे खरीप पिकांची पेरणी २२८ टक्के म्हणजे एक लाख ९१ हजार हेक्टपर्यंत करण्यात आली होती. यात तूर (५० हजार ३२० हेक्टर), मका (५४ हजार हेक्टर), बाजरी (२९ हजार ८०० हेक्टर), सोयाबीन (२५ हजार हेक्टर), मूग (७ हजार ९९९ हेक्टर) आदींचा प्रामुख्याने समावेश होता. गतवर्षांप्रमाणे यंदाही शेतक-यांनी खरीप पिकांच्या पेरण्यांची तयारी करून ठेवली असून केवळ पावसाची प्रतीक्षा आहे. येत्या २१ जूनपर्यंत मृग नक्षत्र असून त्यानंतर आद्र्रा नक्षत्रातही पाऊस न पडल्यास तूर, मूग, उडीद आदी पिकांवर परिणाम होऊ शकतो.