भारतीय हवामानशास्त्र विभागाने आज (रविवारी, दि. १२) विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्‍यता वर्तवली आहे. तर सोमवारीही विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रविवारी विदर्भात अकोला वगळता सगळ्यात जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

याशिवाय, कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये तापमानात घसरण झाली असून, शनिवारी सकाळी अकोला आणि अमरावतीमध्ये काही भागात पावसाच्या सौम्य सरी पडल्याने तेथील नागरिकांना काही क्षणापूरता दिलासा मिळाला आहे. मात्र, त्यानंतर दमटपणा वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

नागपूरचे तापमान गेल्या सात दिवसापासून ४३ अंशावर स्थिर झाले आहे. मात्र, दिवसभराच्या उष्ण वाऱ्यानी नागरिकांना होळपट होत आहे. गुरुवारी ब्रह्मपुरी येथे विदर्भातील सर्वाधिक ४५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. ब्रम्हपूरी आणि चंद्रपूरचे तापमान गेले १५ दिवस सातत्याने ४४ ते ४७ अंशाच्या दरम्यानच दिसून येत आहे.