१६, १७ मार्च ला पुन्हा पावसाची चिन्हे

यावर्षांत पावसाळ्याचे दिवस कमी होतील. केवळ यावर्षांतच नव्हे तर पुढील तीन वर्षांतही पावसाचे दिवस कमीच राहतील, शिवाय उन्हाळ्याच्या तीव्रतेचेही दिवस कमी होतील, असा अंदाज येथील डॉ. एपीजे अब्दुल कलाम खगोल व अंतराळ केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केला आहे. रविवारी विविध भागांत अवकाळी पाऊस झाला. मराठवाडय़ात बीडमधील काही भागात पाऊस झाला. आता याच आठवडय़ात पुन्हा १६ व १७ मार्च रोजीही मराठवाडय़ासह दक्षिण महाराष्ट्र, विदर्भातही हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता असल्याचे औंधकर यांनी सांगितले.

मागील काही वर्षांत सूर्यावरील सौर डागांच्या कमी होणाऱ्या संख्येमुळे हिमयुग अवतरण्यासारखे पोषक वातावरण निर्माण होत आहे. यातून उन्हाळ्याचे दिवस कमी होतील. साधारणत विदर्भात १४ जानेवारीपासून उन्हाळ्याची चाहूल लागल्याची लक्षणे दिसतात. मात्र यावर्षी मार्चअखेपर्यंत वातावरणात थंडी दिसेल. उन्हाळा दरदिवशी वाढताना दिसणार नाही. पश्चिमी विक्षोपीय वाऱ्यांच्या वेगामुळे थंडीचा कार्यकाळ वाढणार आहे. या वाऱ्यांचा ताशी वेग ६० ते ७० किलोमीटर इतका आहे. त्यामुळे वातावरणात एकप्रकारचा गारठा असेल. असाच प्रकार पावसाळ्यातही होण्याची शक्यता आहे. यावर्षी पावसाचेही दिवस कमी झालेले दिसतील. पुढील तीन वर्षांत पाऊस राहण्याची शक्यता औंधकर यांनी व्यक्त केली आहे.

बीड जिल्ह्य़ात तुरळक पाऊस

बीड – हवामानात बदल झाल्याने दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होऊन अवकाळीची भीती निर्माण झाली असून रविवारी जिल्ह्णात काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या. महिनाभरापूर्वीच गारपिटीने झोडपून पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याने आता पाऊस झाला तर गहू आणि ज्वारीचे पीक हातातून जाण्याच्या भीतीने शेतकरी धास्तावला आहे.  बीड जिल्ह्य़ात रविवारी दुपारपासून ढग दाटून आले होते. तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या असून अवकाळीच्या भीतीने शेतकरी धास्तावला आहे. महिनाभरापूर्वी झालेल्या गारपिटीत माजलगाव, गेवराई तालुक्यातील पिके आणि फळबागांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यानंतर आता पुन्हा पावसाचे वातावरण निर्माण होऊ लागल्याने शेतकरी भीती व्यक्त करू लागला आहे. काही ठिकाणी ज्वारीच्या काढणीला वेग आला असून गव्हाचे पीकही जोमात आहे. यावर्षी कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांवर अस्मानी संकट घोंगावू लागले आहे. ढगाळ वातावरणामुळे पाऊस पडेल, या भीतीने शेतकऱ्यांनी कामे आटोपून घेण्यास सुरुवात केली आहे. काही शेतामध्ये तुरळक वेचणीला आलेल्या कपाशीची वेचणीही उरकून घेतली जात आहे.