पावसाळय़ाचा सव्वामहिना कोरडा गेल्याने कोयनेसह ठिकठिकाणचे जलसिंचन प्रकल्प तळ गाठत असताना, आज दमदार पावसास प्रारंभ झाला. बेंदराचा मुहूर्त साधून जलधारा कोसळू लागल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण असून, खरीप हंगामाला दिलासा मिळाला आहे. दिवसभरात कोयना पाणलोट क्षेत्रात ५९ मि.मी. पाऊस झाला आहे. तर, कृष्णा, कोयना नद्यांकाठीही पावसाची रिपरिप सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रात सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात पाऊस कोसळत असल्याची आकडेवारी असून, त्यात पाटण तालुक्याती पाथरपुंज येथे ९८ एकूण १०३८ मि.मी. इतका सर्वाधिक पाऊस झाला आहे. पाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्य़ातील गगनबावडा विभागात ९३ एकूण ९१५ मि.मी. पाऊस नोंदला गेला आहे.
आज सायंकाळपर्यंतची आकडेवारी, कंसात गतवर्षीच्या नोंदी – कोयना धरणाचा पाणीसाठा १२.५८ टीएमसी (७१), उपयुक्त पाणीसाठा ७.४६ (६५.८८), उपयुक्त पाणीसाठय़ाची टक्केवारी ७.०८ (६२.५९), कोयना पाणलोट क्षेत्रातील पाऊस कोयनानगर – ५२ एकूण ६३६ (२,१०५), नवजा ६८ एकूण ७३० (२,४१६), महाबळेश्वर ५७ एकूण ४०७ (२,१७१), सरासरी ५९१ (२२३०.६६) मि.मी. पावसाची नोंद आहे. १ जूनपासून कोयना जलाशयात ४ टीएमसी पाण्याची घट झाली आहे. तर, गतवर्षी आजअखेर ४२ टीएमसी पाण्याची भर पडून कोयनेचा पाणीसाठा ७१ टीएमसी म्हणजेच ६७.४५ टक्के नोंदला गेला होता. आज दिवसभरात सातारा जिल्ह्य़ात कमी अधिक प्रमाणात पाऊस कोसळला आहे. दुष्काळी पट्टय़ातही हा पाऊस झाल्याचे वृत्त आहे. कोयना धरणाखालील कराड व पाटण तालुक्यात पावसाची रिपरिप राहिल्याने जनजीवन विस्कळीत होते. जिल्ह्य़ात ठिकठिकाणी झालेला पाऊस असा- धोमबलकवडी १७ एकूण ९५, जांभळी २५ एकूण १४३, प्रतापगड ५३ एकूण ३८०, धोम प्रकल्प १४ एकूण २०१, माळेवाडी (फलटण) ५ एकूण ५४, तारळी १४ एकूण १७९, ठोसेघर १५ एकूण २४७, वळवण ७३ एकूण ६८७, नागेवाडी ६ एकूण ३३, अपशिंगे २ एकूण ८१, बामणोली  २९ एकूण २८७ व नागठाणे ३ एकूण १११.