18 January 2019

News Flash

राज्यात पावसाचे बारमाही वर्तुळ पूर्ण!

एप्रिल महिन्यामध्ये १७ तारखेला पुणे शहर जिल्ह्यसह राज्यात विविध भागांत पावसाने हजेरी लावली.

(संग्रहित छायाचित्र)

जूनमध्ये सुरू झालेला पाऊस मे महिन्यापर्यंत कायम

पुणे : वातावरणात सातत्याने होणाऱ्या बदलांच्या पाश्र्वभूमीवर या वर्षी राज्याच्या विविध भागांमध्ये प्रत्येक महिन्यामध्ये कुठे ना कुठे तरी पाऊस कोसळला. जूनमध्ये सुरू झालेला पाऊस मे महिन्यातही कायम असल्याने राज्यात यंदा पावसाने बारमाही वर्तुळ पूर्ण केले आहे. या काळात मोसमी, पूर्वमोसमी आणि अवकाळी अशा सर्वच प्रकारच्या पावसाचा आणि वादळ-वाऱ्यासह गारपिटीचा अनुभव नागरिकांनी घेतला. अवकाळी पावसाने शेतीचे मोठय़ा प्रमाणावर नुकसानही केले.

मागील वर्षी राज्यामध्ये नियोजित वेळेला मोसमी पावसाची सुरुवात झाली. पाऊस चांगला झाल्याने धरणे भरली आणि शेतकरीही सुखावला. ऑक्टोबरमध्ये मोसमी पाऊस परतला असे वाटत असताना ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवडय़ापासून पुण्यासह इतर भागामध्ये १३, १४ तारखेला विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला. काही ठिकाणी नद्यांना पूर आला, तर शेतमालाचेही नुकसान झाले. दिवाळीच्या दिवसांत काहीशी उसंत घेत २२, २३ ऑक्टोबरलाही पिकांचे नुकसान करणारा पाऊस झाला.

नोव्हेंबरमध्ये बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होऊन उत्तर अंदमानात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. त्यामुळे राज्याच्या दिशेने बाष्पयुक्त वारे वाहून १९ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत मराठवाडा, नगर, पुणे, मुंबईसह जोरदार अवकाळी पाऊस बरसला. पीक काढणीच्या वेळेला असताना पावसाने त्यावर घाला घातला. डिसेंबर महिना येताच हवामानात पुन्हा मोठा बदल घडला. केरळ, तामिळनाडू किनारपट्टीवर ओळी वादळ दाखल झाले. त्यातून आद्र्रतायुक्त वारे राज्याच्या दिशेने वाहू लागल्याने डिसेंबरच्या पहिल्याच आठवडय़ात राज्याच्या विविध भागाला पावसाने झोडपून काढले. जानेवारीच्या मध्यावर पाऊस झाला. फेब्रुवारीमध्ये १० ते १३ तारखेपर्यंत मराठवाडा विदर्भामध्ये मोठय़ा प्रमाणावर गारपीट झाली. या गारपिटीने पिकांचे अतोनात नुकसान केले. मार्चमध्येही तुरळक पावसाची नोंद झाली.

एप्रिल महिन्यामध्ये १७ तारखेला पुणे शहर जिल्ह्यसह राज्यात विविध भागांत पावसाने हजेरी लावली. ११ महिन्यांमध्ये कुठे ना कुठे पाऊस कोसळत असतानाच मे महिनाही त्याला अपवाद ठरला नाही. अरबी समुद्राकडून राज्याच्या दिशेने येणाऱ्या उष्ण वाऱ्याचा परिणाम म्हणून ११ ते १३ मे दरम्यान पुणे, सांगली, कोल्हापूरसह विविध भागाला पावसाने झोडपून काढले. सांगलीत गारपीट, तर कोल्हापुरात वादळी पाऊस झाला. आता यानंतर मे अखेपर्यंत पूर्वमोसमी पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

यंदा केरळमध्ये आठवडाभर आधीच मोसमी पावसाचे आगमन होणार आहे, मात्र राज्यामध्ये हा पाऊस नियोजित वेळेवर ७ जूनपर्यंत दाखल होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

First Published on May 17, 2018 4:04 am

Web Title: rain started in june in maharashtra continued till may across the state