News Flash

मोसमी वारे सक्रिय, पण पाऊस गायब!

कोकण आणि मुंबई परिसरातही या काळात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. विदर्भातही तो तुरळकच आहे.

मोसमी वारे सक्रिय, पण पाऊस गायब!

पुढील आठवडाभर अनेक भाग कोरडेच?

पुणे : राज्यात मोसमी वाऱ्यांचा प्रवेश होत असताना कोकण विभागासह सर्वच भागांत जोरदार बरसणारा पाऊस सध्या गायब झाला आहे. सध्या मोसमी वारे राज्यभर सक्रिय आहेत, कमी दाबाचे पट्टेही निर्माण होत आहेत, पण अनेक भागांत पाऊस थांबला आहे. सहारा भागातून येणाऱ्या धूलिकणांमुळे सध्या ढगांच्या निर्मितीला पोषक स्थिती नसल्याने हा परिणाम जाणवत असल्याचे मत हवामान शास्त्रज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. राज्याच्या अनेक भागांत पुढील आठवडाभर अशीच स्थिती राहणार असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे.

मोसमी पावसाचा प्रवास यंदा द्रुतगतीने सुरू आहे. केरळमधून दोनच दिवसांत मोसमी पाऊस कोकणमार्गे राज्यात दाखल झाला होता. सध्या त्याने थेट काश्मीपर्यंत धडक दिली आहे. ९ जूनला संपूर्ण कोकणसह मुंबई परिसर ओलांडणाऱ्या मोसमी पावसाने हाहाकार उडवून दिला होता. याच कालावधीत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुख्यत: मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातून तो गायब झाला आहे.

कोकण आणि मुंबई परिसरातही या काळात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. विदर्भातही तो तुरळकच आहे. सोमवारी (१४ जून) संध्याकाळी साडेपाचपर्यंत रत्नागिरी आणि महाबळेश्वरला किरकोळ पाऊस झाला असला, तरी राज्यात इतर ठिकाणी कुठेही पावसाची नोंद झाली नाही.

सध्या खरिपाच्या पेरण्यांचा हंगाम सुरू आहे. अनेक भागांत पूर्वमोसमी आणि मोसमी पाऊस झाला असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या आहेत. मात्र, तीन ते चार दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. चार ते पाच दिवसांपूर्वी पावसाळी स्थितीमुळे राज्यात सर्वच ठिकाणी दिवसाचे कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसच्या खाली आले होते. ते आता पुन्हा ३० अंशांपुढे जाऊन अनेक भागांत उन्हाचा चटका जाणवू लागला आहे.

पाऊसभान

’सद्य:स्थितीत कोकणात काही प्रमाणात पाऊस असला, तरी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस थांबला आहे.

’१ जूनपासून यंदाच्या हंगामातील १४ दिवसांच्या पावसाचा आढावा घेतल्यास कोकणातही सिंधुदुर्गमध्ये पाऊस कमी आहे.

’मध्य महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, मराठवाडय़ातील उस्मानाबाद, विदर्भातील अकोला आदी जिल्ह्य़ांमध्ये सरासरी इतकाही पाऊस झालेला नाही.

सहारा भागातून हवेच्या वरच्या भागात येणाऱ्या धूलिकणांमुळे ढगांची निर्मिती होत नाही. ढगांची निर्मिती झाली तरी त्यांची वाढ होत नाही. त्यामुळे ते पाऊस देत नाहीत. ही स्थिती सध्या निर्माण झाली आहे. परिणामी पाऊस कमी किंवा गायब झाला आहे. २० ते २१ जूनपर्यंत प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि कोकणात काही ठिकाणी पाऊस होईल.

जीवनप्रकाश कुलकर्णी, ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2021 2:59 am

Web Title: rain stopped in many parts of the maharashtra despite imd forecast zws 70
Next Stories
1 लसीकरणातील गोंधळावरून थोरात—विखे समर्थकांमध्ये जुंपली
2 भाडय़ाच्या घरांना व्यावसायिक कर आकारणी
3 वीस हजारांची लाच घेताना पोलिसास अटक
Just Now!
X