मीरगावच्या मृगनक्षत्राने शेतकऱ्यांना दिलासा दिला. पावसाच्या अतिवृष्टीमुळे नदी, नाले, ओहळांना पाणी वाहू लागले. मीरगाच्या पूर्वसंधेला पावसाने लावलेली हजेरी सलामीच ठरली. आज सकाळपर्यंत जिल्ह्य़ात सरासरी ५०.२७ मी. मी. एवढा पाऊस कोसळला. आज दुपारनंतर सुमारे दोन तास अतिवृष्टी झाली. त्यामुळे सवरंचीच धावपळ उडाली.
जिल्ह्य़ात सकाळी नोंदलेला प्रत्येक तालुक्याच्या पावसाची महिती जिल्हा आपत्कालीन कक्षातून मिळविली असता वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक १२६ मी. मी. एवढा पाऊस कोसळल्याची नोंद झाली आहे. वैभववाडी तालुक्यात पावसाने गेल्या सहा दिवसात चांगली हजेरी लावली आहे.
जिल्ह्य़ातील तालुका निहाय कोसळलेल्या पाऊस- वैभववाडी १२६ मी. मी., मालवण ८२ मी. मी., वेगुर्ले ५२.४२ मी. मी., कणकवली ४९.७० मी. मी., सावंतवाडी ३८ मी. मी., देवगड २३ मी. मी., कुडाळ ११ मी. मी. व दोडामार्ग २० मी. मी. एवढा मिळून जिल्ह्य़ात ४०२.१२ मी. मी. म्हणजेच सरासरी ५०.२७ एवढा पाऊस कोसळला.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात विजांचा लखलखाट व ढगांचा गडगडाट करत आज दुपारनंतर पावसाचे शानदार आगमन झाले. अनेक ठिकाणी तब्बल दोन तास पावसाने झोडपून काढले. मुसळधार कोसळलेल्या पावसाने नदी-नाले-ओहोळ, गटारे वाहू लागली.
जिल्ह्य़ात मृगनक्षत्राने शानदार सलामी दिली. त्यातच आज मीरग असल्याने शेतकऱ्यांनी मीरगाचे स्वागत घरोघरी वेगवेगळ्या पद्धतीने केले. काहींनी घरात मीरगाचो कोंबडा मारून तर काहींनी शेतीच्या सीमेवर शेतीचे रक्षणकर्त्यांला कोंबडा बळी देऊन मीरगाचे स्वागत केले. याशिवाय काही ठिकाणी सिमेवरील देवाला वेगवेगळ्या पद्धतीचा नैवेद्य दिला जातो.