जिल्ह्यात २२.५३ मिमी पावसाची नोंद

वाई : ‘तौक्ते‘ चक्रीवादळाचा रविवार आणि सोमवारी साताऱ्याला मोठा फटका बसला आहे. या वादळामध्ये जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडणे, घरावरील पत्रे उडून जाणे आणि विजेचे खांब पडण्याच्या घटना घडल्या आहेत. विद्युत खांब पडल्यामुळे महावितरणचे कोट्यवधींचे नुकसान झाले. तर अनेक भागातील वीज पुरवठाही खंडित झाला आहे. साताऱ्यात सोमवारी  सरासरी २२.५३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

‘तौक्ते‘ चक्रीवादळाचा परिणाम म्हणून सातारा जिल्ह्यात शनिवारपासूनच वेगाच्या वाऱ्यासह पाऊस पडत आहे. रविवारी रात्रीनंतर या वादळी पावसाचा वेग वाढला. यामध्ये पाटण, महाबळेश्वार, पाचगणी, वाई परिसरात याचा जोर मोठा होता. सातारा आणि कराड तालुक्यातही या पावसाने मोठे नुकसान केले आहे.

या वादळामध्ये जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडणे, घरावरील पत्रे उडून जाणे आणि विजेचे खांब पडण्याच्या घटना घडल्या आहेत. विद्युत खांब पडल्यामुळे महावितरणचे कोट्यवधींचे नुकसान झाले. तर अनेक भागातील वीज पुरवठाही खंडित झाला आहे. या वादळी पावसाने शेती मालाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्याच्या टाळेबंदीमुळे शहराकडे जाऊ न शकलेला शेती माल या पावसात मोठ्या प्रमाणात खराब झाला.

तापोळ्याला सर्वांधिक पाऊस

साताऱ्यात सोमवारी  सरासरी २२.५३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस तापोळा (११०.९ मि. मि.) येथे झाला. याशिवाय लामज (११०.३ मि. मि.), पाचगणी (५५.८ मि. मि.) येथेही मोठा पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.