|| रमेश पाटील

पाचशेहून अधिक शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान :- वाडा तालुक्यातील बहुतांशी शेतकरी दरवर्षी रब्बी हंगामात कच्चा हरभरा विकून लाखो रुपयांचे उत्पादन घेत असतात. विशेषत: यासाठी काही जमीन रब्बी (ओसाड) ठेवली जाते. मात्र या वर्षी अवकाळी पावसामुळे या रब्बी जमिनीत पाणी भरून राहिल्याने हरभरा पिकापासून येथील पाचशेहून अधिक शेतकऱ्यांना वंचित राहावे लागले आहे.

विविध प्रकारचे सेंद्रिय खत टाकून खास हरभरा पिकासाठी तयार केलेल्या जमिनीत संपूर्ण पावसाळ्यात पाणी साठवून शेतातील तण (गवत) कुजविले जाते. हरभराव्यतिरिक्त या जमिनीत अन्य कुठलेही पीक घेतले जात नाही. विशेषत: तालुक्यातील गातेस खुर्द व गातेस  बुद्रुक या दोन गावांतील शेतकरी अशा प्रकारच्या दोनशे एकरहून अधिक जमिनीत हरभऱ्याच्या उत्पन्नातून दरवर्षी लाखो रुपयांचे नफा कमवत असतात.

या वर्षी नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या अठवडय़ांपर्यंत पडलेल्या अवकाळी पावसाने येथील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात होणारी हरभरा पिकाची पेरणी नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ातही न झाल्याने येथील शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. हरभरा पिकाची पेरणी केल्यानंतर चांगली उगवण होण्यासाठी आवश्यक असणारी ऑक्टोबर महिन्याची उष्णताही निघून गेली आहे. अजून रब्बीमध्ये (शेतात) पाणी भरलेले असल्याने अजून महिनाभर हरभऱ्याची पेरणी करता येणार नाही. त्यामुळे या वर्षी हरभऱ्याच्या पिकापासून येथील शेतकऱ्यांवर वंचित राहण्याची वेळ आली आहे. ८५०० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केलेले बियाणेही पुढील वर्षीच्या हंगामापर्यंत ते चांगले राहणार नसल्याने येथील शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.

दरम्यान काही शेतकऱ्यांनी हरभऱ्याची पेरणी केलेली अवकाळी पावसामुळे कुजून गेल्याने या शेतकऱ्यांचेही मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. एकंदरीत वाडा तालुक्यातील हरभराचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना या वर्षी लाखो रुपयांच्या उत्पादनाला मुकावे लागले आहे. सेवा सहकारी संस्था, गातेस या संस्थेमधून येथील शेतकऱ्यांनी वीस लाख रुपयांचे कर्ज घेऊन हरभरा बियाणे खरेदी केल्याची माहिती सभापती डी. ए. पाटील यांनी दिली.