सांगली : जिल्ह्य़ातील सांगली, मिरज आणि आटपाडी तालुक्याच्या परिसरात गुरुवारी जोरदार वादळासह गारांचा पाऊस झाला. या वादळी पावसाने आंबा, डाळिंब व द्राक्ष पिकांचे नुकसान झाले आहे. मिरज तालुक्यातील शिपूर, पायाप्पावाडी, एरंडोली आदी परिसरात मोठी गारपीट झाली.

दिवसभराच्या उकाड्यानंतर गुरुवारी दुपारी अडीच वाजणेच्या सुमारास आटपाडी तालुक्यात जोरदार वादळवाऱ्यासह पाऊस झाला. विजेच्या गडगडाटासह मोठ्या प्रमाणात गारांचा माराही झाला.  शेत शिवारासह गावामध्येही गारांचा सडा पडला होता. वाऱ्यामुळे मोकळ्या वावरात असलेल्या शेडवजा छपराचे पत्रेही उडून गेल्याच्या घटना घडल्या.

आटपाडी शहर व परिसरात जोरदार वारे आणि गारांचा पाऊस झाला असला तरी तालुक्यातील दिघंची, करगणी, खरसुंडी आदी परिसरात मध्यम स्वरूपाचा पाउस झाला. या पावसाने आणि गारांच्या मारामुळे आटपाडी परिसरातील डाळिंबाबरोबरच द्राक्ष व  आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. रायवळ आंब्याचा झाडाखाली सडा पडला होता, तर डाळिंबाची कळी खुडली गेली. तसेच एप्रिल छाटणीनंतर फळधारणेच्या अवस्थेतील द्राक्ष बागांच्या काडींना गारांचा मार बसल्याने कोवळी फूट तुटून खाली पडली. तसेच तयार होत असलेल्या द्राक्ष काडीच्या डोळ्यांना गारांचा मारा बसल्यामुळे फळ धारणेवर याचे विपरीत परिणाम होणार आहेत.

दरम्यान, सांगली, मिरज शहरात सायंकाळी विजेचा कडकडाट मोठा असला तरी त्या तुलनेत हलका पाऊस झाला. संचारबंदी  असल्याने रस्त्यावर नागरिकांची वर्दळ अभावानेच असली तरी बंदोबस्तासाठी तनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची मात्र पावसाने त्रेधा उडाली. मिरज तालुक्यातील शिपूर, पायाप्पावाडी, एरंडोली आदी परिसरात गारपीट झाली.

 

सातारा, वाई, महाबळेश्वरमध्ये गारांसह वादळी पाऊस ; स्ट्रॉबेरीचे मोठे नुकसान

वाई : सातारा, महाबळेश्वर, पाचगणी, वाई भागात गुरुवारी ढगांच्या गडगडाटासह जोरदार गारांचा पाऊस झाला. पाचगणीसह महाबळेश्वर, वाई, उत्तर कोरेगाव परिसरात आज दुपारी गारांचा मुसळधार पाऊस पडला. या अवकाळी पावसाने उकाडय़ाने हैराण झालेल्या लोकांना दिलासा मिळाला. या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. आज दिवसभर आभाळ भरून आले होते. मात्र, दुपारी तीननंतर पावसाला सुरुवात झाली. काही वेळात गारांसह मुसळधार पाऊस झाला. पाणीच पाणी करणारा हा पाऊस सुमारे दीड ते दोन तास चालू होता. भिलार परिसरात झालेल्या पावसाने स्ट्रॉबेरी व फराशीचे नुकसान होणार आहे. स्ट्रॉबेरीचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आला असला, तरी असणाऱ्या उत्पादनावर परिणाम जाणवणार असून, पुढे येणाऱ्या पिकावरही याचा परिणाम होईल, असे शेतकऱ्यांनी सांगितले. मागील चार दिवसांपासून सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह गारांचा पाऊस होत आहे.

सातारा शहरात दुपारी झालेल्या पावसात शनिवार पेठेत वीज पडल्यामुळे नारळाच्या झाडाने पेट घेतला. याचवेळी  तीन ते चार घरातील टीव्हींचे नुकसान झाले.