News Flash

करोनाची धास्ती त्यात गारांचा पाऊस

लातूर, बीड, परभणी जिल्ह्य़ांत पिकांचे नुकसान

लातूर, बीड, परभणी जिल्ह्य़ांत पिकांचे नुकसान

बीड/परभणी/लातूर : करोना विषाणूच्या भीतीचे ढग गडद झालेले असतानाच मंगळवारी रात्री बीड आणि परभणी जिल्ह्य़ात  मेघगर्जनेसह गारांचा पाऊस झाला. तर बुधवारी दुपारी लातूर जिल्ह्य़ातील वातावरण ढगाळ बनले. संध्याकाळी लातूर, अहमदपूर, औसा या तालुक्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात पाऊस झाला. आधीच करोना आजाराची भीती असताना पाऊस झाल्यामुळे सर्दी-पडशाच्या रुग्णांमध्ये वाढ होईल काय अशी भीती व्यक्त होत आहे. मंगळवारी झालेल्या पावसामुळे बीडमध्ये उभ्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून धोंडराई व गंगावाडीत वीज पडून गाय आणि बल ठार झाले. तर खळवट लिंबगाव (ता.वडवणी) येथे वीज पडल्याने शेतकरी तुकाराम आश्रुबा खंडुळे जखमी झाले.

बीड जिल्ह्यात मंगळवारपासून करोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सरकारी कार्यालयांसह बहुतांशी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, अशा प्रकारचे आदेश दिले. थंड वातावरण आणि संपर्काने करोना विषाणूचा संसर्ग होतो या भीतीने सर्वत्रच ग्रामीण भागातील नागरिकही भीतीच्या सावटाखाली आहेत. उन्हाची तीव्रता असल्याने आपल्याकडे या विषाणूचा फारसा प्रादुर्भाव होणार नाही असे मानले जात असतानाच मंगळवारी सायंकाळी मेघगर्जनेसह अनेक भागांत गारपीट झाली. खामगावमध्ये गारांचा पाऊस झाला. तर गंगावाडी, धोंडराईत शेतकरी अंकुश भीमराव नवले यांच्या शेतात वीज पडल्याने लिंबाच्या झाडाला बांधलेले बल आणि गाय जागीच ठार झाले. गारांच्या पावसामुळे हातात आलेला हरभरा, गहू, ज्वारी ही रब्बीच्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. करोनाच्या धास्तीने भाजीपाला शहरात जायचा बंद झाला. त्यात गारपिटीने झोडपून काढल्याने शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट आले आहे.

परभणी जिल्ह्य़ात तडाखा, ज्वारी काळवंडणार

परभणी  जिल्ह्यात अवकाळी पावसाने मंगळवारी रात्री अकस्मात हजेरी लावल्याने जिल्ह्याच्या काही भागांत रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे . सेलू तालुक्यातील चिकलठाणा मंडळात  चक्क  ३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. काही दिवसांतच काढणीला  येणाऱ्या  गहू, हरभरा आणि ज्वारीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, गुरुवारी काही भागांत पाऊस होण्याची शक्यता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने वर्तवली आहे.

जिल्ह्यात परभणीसह सेलू, जिंतूर, पूर्णा या तालुक्यांमध्ये रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. परभणी शहर, ग्रामीण भागात पाऊस सुरू होता. पावसाला सुरुवात झाल्यानंतर शहरातला वीजपुरवठा खंडित झाला. तब्बल दीड ते दोन तास शहरात आणि ठिकाणी अंधार होता.

सेलू तालुक्यातील चिकलठाणा मंडळात सर्वाधिक ३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. याच तालुक्यातील वालूर, देऊळगाव, कुपटा, कुंडी, धामणगाव या भागात चांगला पाऊस झाला. जिंतूर, पूर्णा तालुक्यात पाऊस झाला.  जिंतूर तालुक्यात रात्री एकच्या सुमारास विजांचा कडकडाट सुरू होता. वादळी वारे वाहू लागले होते. काही वेळात पावसाला सुरुवात झाली. जिंतूर शहरासह चारठाणा, सावंगी, बामणी या भागात हा पाऊस झाला.  या भागातल्या  ज्वारी, गहू  या पिकांना  पावसाने  तडाखा दिला.

उस्मानाबाद: दिवसभर ऊन असताना बुधवारी सायंकाळी अचानकपणे गारांचा पाऊस सुरू झाल्याने उस्मानाबाद व कळंब तालुक्यातील फळबागांसह रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली, पाडोळी परिसरात सायंकाळी सहाच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. दोन्ही गावांच्या परिसरात द्राक्षबागा नाहीत. मात्र, आंबा, मोसंबी या फळबागांसह रब्बी ज्वारी, गव्हाचे मोठे नुकसान झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2020 3:34 am

Web Title: rain with thunderstorms in beed and parbhani districts zws 70
Next Stories
1 Coronavirus : महाबळेश्वरच्या पर्यटनाला करोना आणि अफवांचा फटका
2 विदर्भासाठी सौर कृषिपंप योजना अव्यवहार्य
3 जलाशयांमध्ये ५६ टक्के साठा; चांगल्या पावसामुळे यंदा चिंता नाही!
Just Now!
X