24 February 2019

News Flash

रेनकोटच्या ‘जीएसटी’त भेद!

पावसात भिजायचे नसेल तर गेल्यावर्षीपेक्षा जरा अधिक महागाच्या वस्तू घ्याव्या लागतील.

बिपीन देशपांडे, औरंगाबाद

पारदर्शक पोशाखाला १३ टक्के अधिक कर; छत्र्याही महागल्या

पावसाळा सुरू झालाय. नवीन रेनकोट, छत्री खरेदी करायचीय? – मग यावेळी तुम्हाला जरा अधिकच कर द्यावा लागेल. कारण वस्तू व सेवाकराच्या नव्या रचनेत पारदर्शक प्लास्टिकच्या रेनकोटवर १८ टक्के तर रेनसूटवर मात्र ५ टक्के कर द्यावा लागणार आहे. पावसात भिजायचे नसेल तर गेल्यावर्षीपेक्षा जरा अधिक महागाच्या वस्तू घ्याव्या लागतील.

गतवर्षी शंभर, दीडशे रुपयांना मिळणाऱ्या छत्रीची किंमत यावर्षी अगदी २०० ते अडीचशे आणि त्यावरही ४०० ते ५०० रुपयांवर गेली आहे. रेनकोटचेही तसेच आहे. ३५० रुपयांचा हलक्या प्रकारातला सूट यावर्षी ४०० ते ४५० पासून सुरू आहे. ६५० ते ७५० रुपयांचे सूट मध्यम प्रतीचे तर ८५० ते १२०० ते अगदी १५०० रुपयांचे काहीसे महागडे रेनसूट बाजारात आहेत. औरंगपुरा भागातील व्यापारी नरेश तनवाणी यांनी सांगितले की, १ जुलैपासून वस्तू व सेवाकर काही वस्तूंवर वेगवेगळ्या प्रकारात लागू झाला. पारदर्शक प्लास्टिकवर १८ तर रेनसूटवर ५ टक्के लागला आहे.

दीडशे ते एकशे ऐंशी रुपयांचा प्लास्टिकचा पारदर्शक रेनकोट हा यावर्षी सव्वा दोनशे, अडीचशे ते ३५० रुपयांपर्यंत आहे. छत्र्यांना १२ टक्के वस्तू व सेवाकर लागू आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा छत्र्यांच्या कि मतीत अगदी दुपटीनेच वाढ झाली आहे.

करफरक :

वस्तू व सेवाकराच्या नियमात पारदर्शक रेनकोट हा प्लास्टिक वस्तूच्या वर्गात मोडतो. प्लास्टिकमध्ये बांगडय़ांसारख्या वस्तूवर शून्य टक्के, मुलांच्या पाण्याच्या बाटल्यांवर १२ टक्के तर ताडपत्रीसारख्या प्लास्टिकवर १८ टक्के कर आहे. या १८ टक्क्य़ांच्या करात प्लास्टिकचा पारदर्शक रेनकोट मोडतो. तर शर्ट-पँट रेनकोट सूटची निर्मिती टेक्सटाईल्सच्या कपडय़ांसारख्या वेगळ्या प्रकारातील. त्यावर केवळ ५ टक्के वस्तू व सेवाकर.  या फरकामुळे दर वेगवेगळे आहेत.

First Published on June 6, 2018 1:55 am

Web Title: raincoat gst