नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे प्रवाह मंदावल्याने सध्या राज्यात पावसाने उघडीप घेतली आहे. मात्र, बंगालच्या उपसागरामधील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली असल्याने विदर्भात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. रविवारी (९ सप्टेंबर) विदर्भासह कोकणातील काही भागात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

पोषक स्थिती नसल्याने प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातील बहुतांश भागात पावसाची उघडीप आहे. कोकण आणि विदर्भामध्ये काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसाची उघडीप असलेल्या भागातील कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र असल्याने विदर्भामध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

मागील चोवीस तासांमध्ये कोकणात विभागातील मुरबाड, गुहागर, उरण, सांगे, मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वर, विदर्भातील मूल, तिरोरा, कामठी, भद्रावती, चंद्रपूर, गडचिरोलीसह विविध भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. घाटमाथा परिसरातही पावसाने हजेरी लावली. शनिवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ाच्या बहुतांश भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते.